मुंबई : समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबु आझमी यांनी पार्टीला स्वत:ची जहागीर बनवली असून महानगरपालिका निवडणुकीत मनमानी पद्धतीने उमेदवारी वाटप केली. परिणामी, पक्ष कार्यकर्त्यांना इतर पक्षाची उमेदवारी घ्यावी लागली असल्याने केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रात त्वरीत हस्तक्षेप करावा, अशी विनंती समाजवादीचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना केली आहे.

आमदार रईस शेख यांनी पार्टीमध्ये सुरु असलेल्या गोंधळाबाबत यादव यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी ‘माझ्या कार्यकर्त्यांना जाणूनबुजून उमेदवारी नाकारली गेली आहे. अबु आझमी यांनी समाजवादीला ‘खाजगी कंपनी’ बनवली आहे. माझ्याविरोधात पक्षात अपप्रचार केला जात आहे. आयात उमेदवारांना पायघड्या घालण्यात येत आहेत. मी म्हणजे पार्टी… अशी अबु आझमी यांची वर्तणूक आहे’, असे गंभीर आरोप केले आहेत.

समाजवादी पक्षाचे रईस शेख आणि अबु आझमी असे राज्यात दोन आमदार आहेत. महानगर पालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात सुरु असलेल्या कलहाने कळस गाठला आहे. यापूर्वी आमदार शेख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. भिवंडीत पक्षाची ताकत असून नेत्यांमधील संघर्षामुळे पालिका निवडणुकीत सपाला फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ‘सपा’ ७१ तर भिवंडीत ६१ जागा लढवत आहे. त्याचबरोबर अमरावती, नाशिक, पुणे, लातूर, मालेगाव, सांगली-मिरज-कुपवाड, नांदेड-वाघाळा आदी महापािलकांमध्ये समाजवादीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

मुंबई महानगरपालिकेत समाजवादी पक्षाचे २०१२ मध्ये ९ नगरसेवक होते तर २०१७ मध्ये ६ नगरसेवक होते. मुंबईत ‘एमआयएम’पेक्षा समाजवादी पार्टी अल्पसंख्याक मतदारामध्ये लोकप्रिय आहे. महाविकास आघाडीचा अनेक वर्षे घटक पक्ष असलेली समाजवादी पार्टी महानगर पालिकांच्या निवडणुका सध्या स्वबळावर लढत आहे.

वादाचे कारण

अबु आझमी हे उत्तर प्रदेशचे मुस्लीम असून रईस शेख हे मूळचे मुंबईतले मराठी मुस्लीम आहेत. आझमी मानखुर्द शिवाजीनगर येथून तर रईस शेख हे भिवंडी पूर्वचे आमदार आहेत. आझमी हे भडकावू वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत.रईस शेख मुंबई महापालिकेत दोन वेळा नगरसेवक होते. भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात आपल्या तालावर चालणार आझमी यांना आमदार हवा आहे. शेख हे २०२४ मध्ये ५२ हजारांच्या फरकांनी निवडून आले आहेत. त्यामुळे दोघांमध्ये हल्ली धुसफूस सुरु आहे. लखनौच्या पक्ष नेतृत्वासाठी मुंबई सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे.