मुंबई : भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपला पडद्यामागून मदत करण्यावरून समाजवादी पक्षात धुसफुस सुरू झाली आहे.  यातूनच भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा पक्षाकडे सादर केला.  त्यावर पक्षविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी दिला आहे.

हेही वाचा >>> जितेंद्र आव्हाड म्हणतात, निवडणुक रोख्यांमुळेच टोरंटची दादागिरी वाढली

पक्ष विस्तारासंदर्भात मांडलेल्या मुद्दयावर पक्ष कार्यवाही करत नसल्याने राजीनामा दिल्याचे आमदार शेख यांनी म्हटले आहे. राजीनाम्याबाबत शेख म्हणाले की, पक्षविस्तारासंदर्भात मी गेले वर्षभर नेतृत्वाकडे भूमिका मांडत आहे. मात्र त्यावर नेतृत्वाने काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे नाइलाजाने मी आमदारकीचा राजीनामा दिला. सपाने मला नगरसेवक आणि आमदार केले. मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असून यापुढे पक्षाबरोबर राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम

भिवंडीत भाजपचे  उमेदवार कपिल पाटील यांनी  समाजवादी पक्षावर  मतांच्या समीकरणाबाबत दबाव टाकला आहे. त्यामुळे अबू आझमी आणि रईस शेख यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यातून रईस शेख यांनी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिल्याचे समजते. दोनच दिवसांपूर्वी रईस शेख यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित केला होता. या संदर्भात समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्याकडे विचारणा केली असता, पक्षविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट केले. भिवंडीतील स्थानिक कार्यकर्त्यांकडून पक्षाकडे बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.