मुंबई : देवनार कचराभूमी स्वच्छ करण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागवल्या असून येत्या तीन वर्षात या ठिकाणचे कचऱ्याचे डोंगर साफ करण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आले आहे. देवनार कचराभूमीवर कचरा साफ करण्याच्या निर्णयाचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी स्वागत केले आहे. समाजवादी पक्षाचे मोठ्या संख्येने मतदार या भागात आहेत. देवनारची जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मागितली असली तरी या जमिनीवर गोवंडी, देवनारवासियांसाठी शाळा व रुग्णालये उभारावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे.

देवनार कचराभूमी येथील अनेक वर्षांपासूनचे ४० मीटर उंचीचे कचऱ्याचे डोंगर लवकरच हटवले जाण्याची शक्यता आहे. देवनार कचराभूमीची १२४.३ एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. मात्र देवनार कचराभूमीवर गेल्या सुमारे शंभर वर्षांपासूनचा कचरा साठला आहे. या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून ही जमीन रिकामी करण्याची मागणी धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणाने राज्य सरकारकडे केली आहे.

कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर टाकण्यात आली असून महसूल व वन विभाग विभागाने पालिका आयुक्तांना पत्र लिहून ही जमीन रिकामी करण्याची विनंती फेब्रुवारी महिन्यात केली होती. त्यानुसार ही कचराभूमी रिकामी करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने निविदा मागवल्या आहेत. त्यावरून आता राजकीय पक्षांमध्येही वाद रंगू लागले आहेत. त्यातच समाजवादी पक्षाचे आमदार आणि मुंबई महापालिकेतील माजी गटनेते रईस शेख यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. गोवंडी येथील रहिवाशांची दीर्घकाळापासूनची ही मागणी होती, असे त्यांनी म्हटले आहे. रईस शेख हे गोवंडी येथे माजी नगरसेवकही होते.

याबाबत रईस शेख यांनी म्हटले आहे की, देवनार येथे कचराभूमी असल्यामुळे गोवंडीतील रहिवाशांना अनेक दशकांपासून भयंकर त्रास सहन करावा लागला आहे आणि आता त्यांना हा कचरा काढून टाकल्यानंतर पुनर्प्राप्त केलेल्या जागेवर रुग्णालये आणि शाळा यांसारख्या आवश्यक सामाजिक पायाभूत सुविधा मिळायला हव्यात. ही कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून बंद केली पाहिजे आणि संपूर्ण प्रक्रियेत महापालिका प्रशासनाने पारदर्शकता राखली पाहिजे, अशीही सूचना रईस शेख यांनी केली.

क्षयरोगाची राजधानी देवनार …

देवनार कचराभूमीमुळे हा परिसर प्रदूषित असून गोवंडी हे क्षयरोग (टीबी), कर्करोग आणि इतर श्वसन रोगांचे केंद्र बनले आहे, असा आरोप शेख यांनी केला आहे. शहराची क्षयरोग आणि कुपोषणाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोवंडीचा सामाजिक-आर्थिक विकास निर्देशक हा सातत्याने सरासरीपेक्षा खूपच खाली राहिला आहे. रहिवाशांना अनेक दशकांपासून त्रास सहन करावा लागत आहे. म्हणूनच, कचरा काढून टाकल्यानंतर पुनर्प्राप्त केलेल्या जमिनीवर त्यांच्यासाठी रुग्णालये आणि शाळा यांसारख्या सामाजिक पायाभूत सुविधा विकसित केल्या पाहिजेत, अशी मागणी शेख यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दररोज हजारो ट्रक करणार ये – जा

कचरा हटविण्याच्या प्रक्रियेदरम्यान सर्व संबंधितांना महापालिकेने विश्वासात घेतले पाहिजे. ही कचराभूमी साफ करण्यासाठी दररोज हजारो ट्रक ये – जा करणार आहेत. कचरा वाहतूक करताना गोवंडीतील रहिवाशांची कमीत कमी गैरसोय होईल याची काळजी घेतली पाहिजे, अशीही मागणी शेख यांनी केली आहे. तीन वर्षात ही कचराभूमी साफ करण्यासाठी दररोज २३ हजार मेट्रीक टन कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी दररोज १२०० ट्रक ये – जा करणार आहेत.