मुंबई : अभिनेत्री समंथा रूथ प्रभू हिचे नाव, प्रतिमा आणि व्यक्तिमत्त्वाशी संबंधित इतर वैशिष्ट्यांचा गैरवापर करणारा बनावट (डीपफेक) आणि आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमांवरून हटवण्याचे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठाने समंथा हिला दिलासा देणारा हा अंतरिम आदेश दिला.
समंथा हिने व्यक्तिमत्त्व अधिकारांच्या संरक्षणासाठी आणि विविध संकेतस्थळे व समाजमाध्याम व्यासपीठांवरून तिचे नाव, प्रतिमा, आवाज व इतर वैशिष्ट्यांच्या कथित गैरवापराबाबत चिंता व्यक्त करून त्याविरोधात दिलासा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अनेक बदल केलेला (मॉर्फ्ड) मजकूर आणि ‘डीपफेक’ प्रकारांकडेही समंथा हिने याचिकेत लक्ष वेधले होते. तिच्या या याचिकेवर न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून तयार केलेल्या ‘डीपफेक’सह, समंथाचे नाव, प्रतिमा आणि आवाजाचा बेकायदा वापर करणाऱ्या आक्षेपार्ह मजकुराच्या प्रकाशनावरही एकलपीठाने बंदी घातली. समंथा हिच्या अधिकारांना तिच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण प्राप्त आहे. त्यात भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार, गोपनीयतेचा अधिकार आणि मानवी प्रतिष्ठेचा अधिकार यांचा समावेश होतो. तथापि, प्रतिवादींच्या कृतींमुळे समंथा हिच्या या सर्व मौल्यवान अधिकारांचे उल्लंघन झाले आहे आणि त्यावर विपरीत परिणाम झाला आहे, असेही न्यायालयाने समंथा हिला दिलासा देताना नमूद केले.
