Kolhapur Politics Samarjeet Ghatge Joins BJP in Mumbai : मुंबई : कागल येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे, त्यांचे पुत्र अखिलेश, विरेंद्र घाटगे यांनी कार्यकर्त्यांसह बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. घाटगे यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपची ताकद पुन्हा एकदा वाढणार आहे.

घाटगे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अनेक दिवसांपासून होती. विशेषतः नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचे अनेक कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, राजवर्धन नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे, भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

यापुढील काळात घाटगे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे. ज्या विश्वासाने त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. तर पक्षाकडून जी काही जबाबदारी सोपवली जाईल ती पार पाडण्यासाठी आम्ही जोमाने काम करून पक्षाची विचारधारा गावागावात, घराघरात पोहचवू, असा विश्वास घाटगे यांनी व्यक्त केला.

घाटगे यांच्यासह पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष जयंत रावण, जिल्हा परिषद सदस्या शिवानी विजयसिंह भोसले, पंचायत समिती सदस्य अनिलकुमार हेगडे, रंजना बापू अस्वले, नगरसेवक दीपक मगर, सभापती शिक्षण समिती अरुण गुरव, महिला बालकल्याण समिती सारिका बारड, नगरसेविका साधना पाटील, नगरसेवक सुशांत कालेकर, उमेश सावंत, बाळासाहेब माळी, मेघा माने, आनंदा पसारे, विजय राजगिरे, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, हमिदवाडा साखर कारखान्याचे संचालक कैलाश जाधव, सरपंच संभाजी फराकटे यांनीही भाजपात प्रवेश केला.