मुंबई : राज्यसभा निवडणुकीबाबत आपल्याला शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उमेदवारी देण्याचे ठरले होते आणि त्यावर  शिक्कामोर्तबही झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द फिरवला. त्यांनी शब्द का मोडला हे कळत नाही, असा संताप संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी व्यक्त केला. तसेच निवडणुकीत होणारा घोडेबाजार टाळण्यासाठी निवडणूक लढणार नसल्याची  घोषणाही त्यांनी  केली. 

राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून गेले काही दिवस शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात वाद सुरू होता. संभाजीराजे यांनी शिवबंधन बांधल्यास त्यांना लगेच उमेदवारी देण्याची भूमिका शिवसेनेने घेतली होती. संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेने गुरुवारी कोल्हापूरचे संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुरेशा आमदारांच्या सह्या आपल्याकडे आहेत आणि निवडून येण्याइतपत पाठबळही असल्याचा दावा केला.

ठाकरे यांनी सुरुवातीला मला भेटण्यासाठी दोन खासदारांना पाठवले होते. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये आमची बैठक झाली. त्यावेळी आपण शिवसेनेत प्रवेश करावा, असा प्रस्ताव खासदारांनी मांडला. तेव्हा मी स्पष्टपणे नकार दिला. राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणूनच लढणार, असे त्यांना सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला ‘वर्षां’ बंगल्यावर भेटायला बोलावले. तेव्हाही मी अपक्ष म्हणून लढणार यावर ठाम होतो, असे संभाजीराजे यांनी सांगितले. 

संभाजीराजे खासदार झाले नाहीत हे दुर्दैवी- पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून शिवसेनेची कळ काढली आहे. संभाजीराजे खासदार झाले नाहीत हे दुर्दैवी पण त्यांना कायम पाठिंबा राहील असे विधान करत काँग्रेसचा जुना मतदार असलेल्या मराठा समाजाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘इतर पक्षांचे माहीत नाही, परंतु संभाजीराजे राज्यसभेत जावेत अशी काँग्रेसची मनापासून इच्छा होती. महाराष्ट्राच्या नेतृत्वाची एक वेगळी शान त्यांच्या नेतृत्वामुळे होती,’ असे पटोले यांनी सांगितले.