राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची टर्म संपल्यानंतर अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना खुलं पत्र लिहिलं. या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजेंनी वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. ही भेट राज्यसभा निवडणुकीबाबत आहे की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आहे हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळेच चर्चांना उधाण आलं आहे.

संभाजीराजेंनी दोन दिवसांपूर्वीच राज्यातील सर्व आमदारांना उद्देशून एक खुलं पत्र लिहिलं होतं. यात त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक राज्यसभेची जागा, तर भाजपाला दोन जागांवर विजय मिळेल. सहाव्या जागेसाठी कोणत्याही पक्षाकडे संख्याबळ नाही. त्यामुळे अपक्ष म्हणून सहाव्या जागेसाठी मला पाठिंबा द्यावा, असं आवाहन संभाजीराजेंनी केलंय. तसेच आपली भूमिका सांगण्यासाठी सर्वांना भेटणार असल्याचंही त्यांनी सुतोवाच केलं होतं. या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी १२ मे रोजी आपल्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात दोन मोठे निर्णय जाहीर केले होते. यातील पहिला निर्णय राज्यसभेच्या खासदारकीबाबत, तर दुसरा निर्णय संघटनेच्या स्थापनेबाबत होता.

राज्यसभा खासदारकीबाबत घेतला मोठा निर्णय

संभाजीराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या राज्यसभेच्या खासदारकीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. ते म्हणाले होते, “या वर्षीची राज्यसभेची निवडणूक मी नक्कीच लढवणार आहे. यावर्षीची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. राजकारण विरहीत, समाजाला दिशा देताना मी कधीही त्याचा फायदा कुणाला होईल हे न पाहाता समाजाचं हित पाहिलं. त्यामुळे माझा अधिकार बनतो की आपण अपक्ष म्हणून मला पाठिंबा देणं गरजेचं आहे. जे २९ अपक्ष आमदार आहेत, त्यांनी मोठं मन दाखवायला हवं.”

“फक्त छत्रपतींचा वंशज म्हणून नाही, तर माझी कार्यपद्धती पाहून पाठिंबा द्यावा. मी तुम्हाला नक्कीच भेटून माझी बाजू समजावून सांगणार आहे. माझ्या कामाची दखल गेऊन तुम्ही मला राज्यसभेत पाठवावं अशी विनंती मी सर्वपक्षीय नेत्यांना करतो. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार आहे. मी आजपासून कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही”, असं संभाजीराजे भोसले यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

स्वराज्य संघटनेची घोषणा!

आपल्या दुसऱ्या निर्णयामध्ये त्यांनी एका नव्या संघटनेची घोषणा केली होती. “मला वेगवेगळ्या संघटनांचे, पक्षांचे लोक पाठिंबा देतात. ही छत्रपती घराण्याची ताकद आहे. मला चांगले-वाईट अनुभव देखील आले. या जनतेला एका छताखाली कसं आणता येईल, हा माझा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच राहिला आहे. त्यामुळे मी दुसरा निर्णय असा घेतला आहे की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या सगळ्यांना संघटित करण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी, सगळ्यांच्या कल्याणासाठी मी आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापन करणार आहोत. त्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य. यासाठी मी याच महिन्यात राज्याचा दौरा करणार आहे. लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी हा दौरा करणार आहे. आजपासून ही संघटना स्थापन झाली आहे”, असं संभाजीराजे भोसले यांनी जाहीर केलं होतं.