रविवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याच्या तस्करीच्या ८ घटना उघडकीस आल्या आहे. हवाई गुप्तचर विभागने ही कारवाई करून सुमारे  ७५ लाखांचे सोने जप्त केले आहे. सोन्याची तस्करी रोखण्यासाठी हवाई गुप्तचर विभागाने विमानतळावर कसून तपासणी सुरू केली आहे. रविवारी विभागाने कारवाई करून तस्करीची आठ प्रकरणे उघडकीस आणली आहेत. दुबई आणि केनियातून आलेल्या महिला प्रवाशांनी हे सोने दडवून आणले होते. दोन महिलांनी बुरख्यात मोठय़ा खुबीने सोने दडवले होते. काहींनी सामानात सोने दडवले होते. एकाच दिवसात ८ सोन्याची तस्करी उघड आणण्याचे गेल्या काही दिवसातले हे पहिलेच उदाहरण आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे  ७५ लाख रुपयांच्या घरात आहे. हवाई गुप्तचर विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद लांजेवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे तस्करीत वाढ होत असल्याचे ते म्हणाले. अन्य एका प्रकरणात दुबईला जाणाऱ्या एका महिला प्रवाशाकडून २४ लाखांचे परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे.