अमली पदार्थ विरोधी विभागाचे (NCB) मुंबई संचालक समीर वानखेडे यांच्या लग्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले. यानंतर आता स्वतः समीर वानखेडे यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केलीय. यात त्यांनी मुस्लीम पद्धतीने विवाह का केला याचं कारणही सांगितलंय. “माझी आई मुस्लीम होती, बाबा हिंदू आहेत. मी दोघांवरही खूप प्रेम करतो. माझ्या आईने मुस्लीम पद्धतीने विवाह करण्यास सांगितला आणि तो मी केला,” असं मत समीर वानखेडे यांनी व्यक्त केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समीर वानखेडे म्हणाले, “भारत हा पुरोगामी देश आहे त्याचा मला अभिमान आहे. माझी आई मुस्लीम होती, बाबा हिंदू आहेत. मी दोघांवरही खूप प्रेम करतो. माझ्या आईने मुस्लीम पद्धतीने विवाह करण्यास सांगितला तो मी केला. कारण मी आईचा शब्द पाळला, मी गुन्हा केला नाही. ज्या महिन्यात निकाह झाला त्याच महिन्यात मी विशेष विवाह कायद्यानुसार (Special marriage act) नोंदणी करून घेतली. मी जे केलं तो गुन्हा नाहीये.”

“थोड्याच वेळात माझे बाबा विवाह प्रमाणपत्र समोर ठेवतील”

“थोड्याच वेळात माझे बाबा ज्ञानदेव वानखेडे स्पेशल विशेष विवाह कायद्याचं प्रमाणपत्र समोर ठेवतील,” असंही समीर वानखेडे यांनी नमूद केलं.

नवाब मलिक यांचे समीन वानखेडे यांच्या लग्नाबाबत नेमके आरोप काय?

मलिक यांनी काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी मुस्लिम असल्याचं लपवून नोकरीसाठी कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. हे आरोप समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी फेटाळून लावल्यानंतर आता नवाब मलिक यांनी थेट समीर वानखेडेंचा निकाह नामाच ट्विट केला. समीर हे मुस्लिम असल्याच्या आपल्या दाव्याला समर्थन करणारे ट्विट्स मलिक यांनी केले.

हा निकाह नामा समीर दाऊद वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा असून त्यांनी डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी निकाह केलेला असं निकाहनामा शेअर करताना नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. या निकाह नाम्यामध्ये नवऱ्याचं नाव यापुढे समीर दाऊद वानखेडे असं लिहिलेलं दिसत आहे. तर त्या खाली नवरीचं नाव शबाना जाहीद कुरेशी असं लिहिलेलं आहे. तसेच मुलीच्या वडिलांचं नाव जाहीद कुरेशी असल्याचं या निकाह नाम्यावर लिहिल्याचं दिसत आहे. त्या खालोखाल दुसरा साक्षीदार म्हणून समीर यांची थोरली बहीण जास्मिन दाऊद वानखेडेंचे पती अजीज खान यांनी यावी दुसरे साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केल्याचा दावा नवाब मलिक यांनी केलाय.

हेही वाचा : समीर वानखेडेंना धर्मावरुन टार्गेट केलं जात असल्याच्या टीकेला नवाब मलिकांचं उत्तर; म्हणाले, “मी करतोय ते…”

गुरुवारी, ७ डिसेंबर २००८ रोजी रात्री आठ वाजता समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह अंधेरी पश्चिमधील लोखंडवाला कॉम्पलेक्स येथे झाला होता, असा दावा नवाब मलिक यांनी एका ट्विटमध्ये केलाय. तसेच मेहर म्हणून ३३ हजारांची रक्कम घेण्यात आली होती, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. मलिक यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे सर्व माहिती त्यांनी पोस्ट केलेल्या निकाहनाम्यामध्ये दिसत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer wankhede answer why he married according to muslim tradition pbs
First published on: 27-10-2021 at 12:40 IST