मुंबई : आर्यन खान याची सुटका करण्यासाठी अभिनेता शाहरूख खान याच्याशी आपण कधीही संपर्क साधलेला नव्हता. तसेच लाचेची मागणी केली नाही आणि घेतलीही नाही, असा दावा केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांच्यातर्फे सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आला.

साल २०२१ मधील कॉर्डिलिया क्रुझ प्रकरणी शाहरुख खानकडे लाच मागितल्याचा वानखेडे यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका केली होती. न्यायालयानेही याचिकेची दखल घेऊन सीबीआयांच्या संथ तपासावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच, तपास पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अजून तुम्हाला किती दिवस लागतील ? असा प्रश्न केला होता.

मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे वानखेडे यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी, वानखेडे यांच्यातर्फे उपरोक्त दावा करण्यात आला. तथापि, सीबीआयचे वकील सुनावणीसाठी उपस्थित नसल्याने न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी मंगळवारी ठेवली. हे प्रकरण बऱ्याच काळापासून प्रलंबित असल्याने ते फारकाळ प्रलंबित ठेवता येणार नाही, असेही न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी तहकूब करताना स्पष्ट केले.

तत्पूर्वी, वानखेडे यांच्या वतीने युक्तिवाद करताना वरिष्ठ वकील आबाद पोंडा यांनी लाचेच्या आरोपांचे खंडन केले. केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) पश्चिम क्षेत्राच्या विभागीय संचालकपदी कार्यरत असाताना आपण बॉलीवूड आणि अमलीपदार्थ तस्करीचे एक रॅकेट उडकीस आणले होते. त्यावेळी अनेकांची चौकशी झाली होती. काहींकडे अमलीपदार्थही सापडले होते. त्याच काळात मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रुझवर टाकलेल्या छाप्यात आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. त्याचमुळे आपल्याला खोट्या आरोपांत गोवण्यात आले होते.

आर्यनला वाचवण्यासाठी शाहरूख खानकडे आपण २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आपल्यावर करण्यात आला. पुढे, तडजोड केली जाऊन ही रक्कम १८ कोटी रुपये ठरवण्यात आली. त्यातील ५० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारल्याचाही आरोप आपल्यावर आहे. परंतु, आपण शाहरूख खानशी कोणताही संपर्क साधलेला नाही. आपले नाव वापरून कोणी हे कृत्य केले असेल तर त्याला आपण जबाबदार नाही, असा दावा वानखेडे यांच्यावतीने करण्यात आला.

राजकिय सूडबुद्धीने गोवले

आपण निष्पक्ष आणि प्रामाणिकपणे तपास केला असून तपासादरम्यान आपल्यावर विविध कारणांनी दबाब टाकण्यात येत होता. आपल्याला एका राजकीय व्यक्तीकडून सतत लक्ष्य करण्यात आले. आतापर्यंतच्या कारकीर्दीत आपण कधीही चुकीचे वागलेलो नाही. आपल्यावरील सर्व आरोप निराधार असून आपण कोणत्याही चौकशीला समोर जायला तयार आहोत, असा दावा वानखेडे यांच्यातर्फे करण्यात आला.

आपल्या कुटुंबीयांवरही सतत आरोप केले गेले. आपली काही खासगी छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आली. हे सारे आरोप हे पूर्णतः खोटे, दिशाभूल करणारे असून एनसीबीसारख्या स्वतंत्र तपास यंत्रणेची प्रतिमा मलीन करण्यासाठी केले असल्याचेही एनसीबीने त्यावेळी प्रतिज्ञापत्रात म्हटलं होते याकडे वानखेडे लक्ष वेधले.

अधिकाऱ्यांवर खंडणीचे आरोप करून या प्रकरणातील तपासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एनसीबीच्या सर्व अधिकाऱ्यांची सेवा निष्कलंक आहेत आणि प्रामाणिकपणे मुंबई अमली पदार्थमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे देखील एनसीबीने त्यावेळी म्हटले होते , असे वानखेडे यांनी न्यायालयाला सांगितले.