आर्यन खान प्रकरणामुळे होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे वादात सापडलेले समीर वानखेडे हे अंतर्गत चौकशीसाठी दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात दाखल झाले आहेत. एनसीबीच्या कार्यालयाबाहेर समीर वानखेडे यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजी करत गर्दी केली आहे. काही जणांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचेही पोस्टर्स हातात घेत गर्दी केली आहे.

आर्यन खान आणि मुंबईतल्या क्रूझवरच्या ड्रग्ज पार्टीप्रकरणी पैसे मागितल्याचा दावा पंच प्रभाकर साईल यांनी केला होता. त्यानंतर घडामोडींना चांगलाच वेग आला असून एनसीबीच्या दक्षता समितीचं पथक अंतर्गत तपासासाठी मुंबईत जाणार आहे. मात्र, आता समीर वानखेडे हे स्वतः दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता वानखेडे यांची त्यांच्या पदावरुन बदली होऊ शकते, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

या ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंना सुरूवातीपासूनच आरोपांचा सामना करावा लागला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर ते काल रात्री तातडीने दिल्लीला आले आणि आज एनसीबी कार्यालयात दाखल झाले. याविषयी माध्यमांना त्यांनी विचारणा केली असता, आपल्याला कोणतेही समन्स बजावण्यात आले नाही असं उत्तर वानखेडे यांनी दिलं होतं. त्यामुळे आता ते तातडीने दिल्लीला का आले? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आपण मुंबईला गेल्यानंतर याविषयी भाष्य करणार आहोत असं वानखेडे यांनी म्हटल्याचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.