महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यासोबतच त्यांनी समीर वानखेडे यांच्यावर प्रायव्हेट आर्मीच्या माध्यमातून खंडणीचा आरोप केला. तसेच नवाब मलिक यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेवरूनही भाजपावर निशाणा साधला.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात नव्याने आरोप केले. यावेळी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या महागड्या लाइफस्टाइलवर प्रश्न चिन्हं उभे केले. त्यानंतर नवाब मलिक यांच्या आरोपांना समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. समीर वानखेडे यांच्या महागड्या लाइफस्टाइलवरून मलिकांनी टीका केली होती. प्रामाणिक अधिकाऱ्यांना कोट्यवधींचे कपडे कसे परवडतात, असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर क्रांती रेडकरने ट्विट करत मलिकांना उत्तर दिले आहे.

समीर वानखेडे यांची ही संपत्ती त्यांच्या आईची आहे, असा दावा क्रांती रेडकरने केला आहे. समीर यांची सर्व संपत्ती त्यांच्या आईने मिळवलेली आहे जेव्हा त्या हयात होत्या. ही रक्कम नक्कीच ५० कोटी किंवा १०० कोटी एवढी नाही. समीर १५ वर्षांचे असल्यापासून ही संपत्ती आहे. यासंबंधी सर्व कागदपत्र सरकारी अधिकाऱ्यांसाठी असलेल्या नियमानुसार वेळोवेळी सरकारला दिलेली आहेत. त्यामुळे ही बेनामी संपत्ती नाही. सावन के अंधे को हरियाली दिखती है,” अशी टीका क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांच्यावर केली आहे.

त्याआधी नवाब मलिकांचे आरोप समीर वानखेडेंची बहिण जास्मिन वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत. समीर वानखेडेंकडे असलेल्या महागड्या घडळ्यांबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या आईने दोन्ही मुलांना महागडी घड्याळं दिली होती, असा दावा जास्मिन वानखेडे यांनी केला आहे. समीर वानखेडे वर्षातून एकदाच कपडे खरेदी करतात, नवाब मलिक यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, असे जास्मिन वानखेडे यांनी म्हटले आहे.

पँट लाख रुपयांची, पट्टा २ लाखाचा, घड्याळ ५० लाखाचे आणि..”, नवाब मलिकांकडून समीर वानखेडेंवर हल्लाबोल

समीर वानखेडेंनी हजारो कोटींची वसूली केली आहे याची चौकशी व्हायला हवी असे नवाब मलिकांनी म्हटले आहे. “एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा शर्ट हजार-पाचशेपेक्षा महागडा नाही, पण समीर वानखेडेचा शर्ट ७० हजार रुपयांचा का असतो? प्रत्येक दिवशी नवे कपडे घालतात. मोदींच्याही पुढे गेलेत. पँट लाख रुपयांची, पट्टा २ लाखाचा, बुट अडीच लाखाचे, घड्याळ ५०, ३०, २५ लाख रुपयांचं. मी याचे सर्व फोटो तुम्हाला देईल. या सर्व काळात त्यांनी जशाप्रकारचे कपडे घातलेत त्याची किंमतच ५-१० कोटी रुपये आहे. काय प्रामाणिक अधिकारी १० कोटींचे कपडे घालत असतील का? समीर वानखेडेंनी कोणतेही शर्ट पुन्हा घातलेले पाहिले नाही. दोन लाखांचे बुट घालणारा असा प्रामाणिक अधिकारी कोणी नसेल. आम्ही प्रार्थना करतो की देशातील सर्व प्रामाणिक अधिकाऱ्यांची अशाच प्रकारे प्रगती व्हावी,” असे मलिकांनी म्हटले आहे.

समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर

समीर वानखेडे अनेक महागड्या वस्तू वापरतात, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. यावर आता समीर वानखेडेंनी पत्रकारांशी बोलताना उत्तर दिलं आहे. “माझ्या महागड्या कपड्यांचं म्हणाल, तर ही फक्त एक अफवा आहे. नवाब मलिक यांना याविषयी फार कमी माहिती आहे. त्यांनी याविषयी खरी माहिती शोधून काढायला हवी”, असं समीर वानखेडे म्हणाले.