“माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम, मला माझ्या…,” नवाब मलिकांच्या ‘त्या’ आरोपांवर समीर वानखेडेंचं स्पष्टीकरण

“गेल्या काही दिवसांपासून माननीय मंत्र्यांच्या कृत्यांच्या मालिकेने मला आणि माझ्या कुटुंबाला जबरदस्त मानसिक आणि भावनिक दबावाखाली ठेवले आहे”

sameer wankhede nawab malik
समीर वानखेडे यांनी एक पत्रक जारी करत दिलं स्पष्टीकरण

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झालेल्या अमली पदार्थ प्रकरणातील पंचाने अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. ‘एनसीबी’वरील लाचखोरीच्या आरोपांमुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एनसीबीने मात्र आरोप फेटाळले आहेत. दरम्यान समीर वानखेडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे नवाब मलिक यांनी ट्वीटरवर समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो शेअर केल्याने या प्रकरणाला आता आणखीन एक वळण मिळालं आहे. या फोटोवरुन चर्चा सुरु असतानाच आता समीर वानखेडे यांनी या फोटोसंदर्भात पहिली प्रतिक्रिया दिलीय.

वानखेडे यांनी यासंदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. महाराष्ट्र सरकारमधील माननीय अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी माझ्याशी संबंधित काही दस्तऐवज त्यांच्या ट्विटर हँडल वर प्रकाशित केले आहेत ज्यात “समीर दाऊद वानखेडे असं नाव घेत ‘फर्जीवडा हुआ’ असे सांगितले गेले आहे, असं म्हटलंय.

“याच संदर्भात मी सांगू इच्छितो की माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे ३० जून २००७ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. माझे वडील हिंदू आणि माझी आई स्वर्गीय श्रीमती झहीदा मुस्लिम होत्या. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र, बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे आणि मला माझ्या वारशाचा अभिमान आहे,” असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

“मी २००६ मध्ये विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत नागरी विवाह समारंभात डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केले. २०१६ मध्ये विशेष विवाह कायद्याअंतर्गत आम्ही दोघांनी दिवाणी न्यायालयाद्वारे परस्पर घटस्फोट घेतला. २०१७ मध्ये मी क्रांती दीनानाथ रेडकर ह्यांच्याशी लग्न केले,” असं वानखेडे यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना सांगितलं आहे.

“ट्विटरवर माझे वैयक्तिक दस्तऐवज प्रकाशित करणे हे निंदनीय आहे आणि माझ्या कौटुंबिक गोपनीयतेवर अनावश्यक आक्रमण आहे. मला, माझे कुटुंब, माझे वडील आणि माझ्या दिवंगत आईला बदनाम करण्याचा हेतू आहे. गेल्या काही दिवसांपासून माननीय मंत्र्यांच्या कृत्यांच्या मालिकेने मला आणि माझ्या कुटुंबाला जबरदस्त मानसिक आणि भावनिक दबावाखाली ठेवले आहे,” असं वानखेडे म्हणाले आहेत.

“माननीय मंत्र्याकडून कोणतेही औचित्य न बाळगता वैयक्तिक, बदनामीकारक आणि निंदनीय हल्ल्यांच्या प्रकारामुळे मी दुःखी झालो आहे,” असंही वानखेडे यांनी म्हटलंय. या शिवाय प्रसार माध्यमांशी बोलताना “माझं स्पष्टीकरण कोर्टात दिलं आहे,” असं एनसीबीच्या कार्यालायबाहेर पत्रकारांशी बोलताना वानखेडे यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sameer wankhede explanation on wedding photo posted by nawab malik scsg

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या