क्रुझ ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समीर वानखेडेंविरोधात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक रोज नवनवीन खुलासे करत आहेत. यामध्ये बुधवारी त्यांनी समीर वानखेडे यांचा निकाहनामा शेअर केला. ज्यानंतर वानखेडे यांचं पहिलं लग्न लावून देणारे काझी माध्यमांसमोर आले. मुजम्मिल अहमद नावाच्या काझींनी सांगितले की त्यांनी २००६ मध्ये समीर वानखेडे यांचा निकाह पठण केलं होतं. तसेच “मी कोणत्याही गैर मुस्लिमांचे निकाह पठण करत नाही, समीर वानखेडे लग्नाच्या वेळी मुस्लिम होते,” असा दावा या काझींनी केला होता. त्यांनतर समीर वानखेडेंचे वडील त्यांच्या बचावासाठी समोर आले आहेत. त्यांनी नवाब मलिकांना रावण म्हणत भीती व्यक्त केली आहे.

“आमच्या जीवाला धोका आहे. नवाब मलिक एक प्रभावी व्यक्ती आहे असून त्याचे रावणासारखे १० हात, १० तोंड आहेत. शिवाय त्याच्याजवळ पैसा आहे, त्यामुळे तो काहीही करू शकतो. मी दलित आहे, माझी पत्नी मुस्लीम होती, मग माझा मुलगा मुस्लिम कसा होऊ शकतो?” असा सवाल समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडेंनी उपस्थित केला आहे.

सर्व आरोप फेटाळून लावत ज्ञानदेव वानखेडे म्हणाले की, “मी कधीही धर्म बदलला नाही. माझा आणि माझ्या पत्नीचा आंतरधर्मीय विवाह झाला होता पण मी किंवा माझ्या पत्नीने कधीही धर्म बदलला नाही.” यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीचे प्रतिज्ञापत्रही पुरावा म्हणून दाखवले. ते म्हणाले, “माझा मुलगा समीर हा महाभारतातील अभिमन्यूसारखा आहे जो यावेळी शत्रूंनी घेरला आहे, पण मला खात्री आहे की तो अर्जुनासारखा हा चक्रव्यूह तोडून बाहेर येईल.” मंत्री नवाब मलिक यांना रावण संबोधत ते म्हणाले की, नवाब मलिक अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत.