मुंबई : केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांनी तपास केलेल्या दोन प्रकरणांमधील कथित अनियमिततेबाबतची चौकशी ही निनावी तक्रारींच्या आधारे सुरू करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या सांगण्यावरून ही चौकशी करण्यात आलेली नाही, असा दावा केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मंगळवारी उच्च न्यायालयात केला.

वानखेडे हे २०२४ पासून याचिका आणि इतर कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब करून चौकशीच्या प्रक्रियेस विलंब करत असल्याचा दावा देखील एनसीबीने प्रतिज्ञापत्रात केला आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठापुढे वानखेडे यांनी केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी, वानखेडे यांच्या आरोपांचे खंडन करणारे आणि आपली बाजू मांडणारे प्रतिज्ञापत्रे एनसीबीतर्फे न्यायालयात दाखल करण्यात आली. या प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्यासाठी वानखेडे यांच्यातर्फे वरिष्ठ वकील राजीव चव्हाण यांनी वेळ देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. ती न्यायालयाने मान्य केली व प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली.

दरम्यान एनसीबीच्या प्रतिज्ञापत्रानुसार, वानखेडे यांनी तपास केलेल्या दोन प्रकरणांतील अनियमिततेची प्राथमिक चौकशी दोन विशिष्ट आणि निनावी तक्रारींच्या आधारे सुरू केली होती. नवाब मलिक किंवा त्यांच्याकडून आलेल्या कोणत्याही सूचनेच्या अनुषंगाने ही चौकशी सुरू केली नव्हती. वानखेडे यांच्याविरोधातील दोन्ही तक्रारींमध्ये समाविष्ट असलेल्या आरोपांची पडताळणी आणि त्याबाबत चौकशी करण्याचा अधिकार तपास यंत्रणेकडे असल्याचा दावाही एनसीबीने प्रतिज्ञापत्रात केला आहे. तसेच वानखेडे यांच्याविरुद्धची चौकशी अद्याप प्राथमिक टप्प्यावर असून त्यांना त्यांची बाजू मांडण्याची निष्पक्ष संधी देण्यात येईल, असे देखील एनसीबीने वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावण्याबाबत स्पष्टीकरण देताना प्रामुख्याने नमूद केले. वानखेडे हे २०२४ पासून याचिका आणि इतर कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब करून चौकशीच्या प्रक्रियेस विलंब करत असल्याचा दावाही एनसीबीने प्रतिज्ञापत्रात केला.

प्रकरण काय ?

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्याशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरणाच्या तसेच एका नायजेरियन नागरिकाला अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी केलेल्या अटकेच्या तपासात अनियमितता असल्याची निनावी तक्रार एनसीबीकडे करण्यात आली होती. त्यानंतर एनसीबीने वानखेडे यांच्याविरोधात प्राथमिक चौकशी सुरू केली. त्यानुसार, एनसीबीने नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२४ या काळात वानखेडे यांना नोटीस बजावून चौकशीसाठी विशेष पथकासमोर उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र, अंमलीपदार्थ प्रकरणी मलिक यांच्या जावयावर आपण अटकेची कारवाई केली होती. त्यामुळे, मलिक यांच्या सांगण्यावरून आपल्याला लक्ष्य केले जात असून आपल्याविरुद्ध सूडबुद्धीने चौकशी सुरू असल्याचा दावा वानखेडे यांनी केला होता व उच्च न्यायालयात धाव घेतली होती.