scorecardresearch

…तरच समीर वानखेडेंची बदली केली जाईल; लाचखोरीच्या प्रकरणासंदर्भात NCB महासंचालकांची माहिती

समीर वानखेडे यांच्या विभागीय चौकशीसाठी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग आणि संचालक दर्जाचे तीन सहकारी आज दिल्लीहून मुंबईला येणार आहेत.

Sameer Wankhede nc pradhan ncb
आज एनसीबीचं पथक मुंबईमध्ये चौकशीसाठी येणार (फाइल फोटो सौजन्य, पीटीआय आणि एएनआय)

आर्यन खान प्रकरणात वादात सापडलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मंगळवारी दिल्लीतील ‘एनसीबी’च्या मुख्यालयात उपमहासंचालकांसमोर आपली बाजू मांडली. मात्र, वानखेडे यांच्यावर झालेल्या कथित लाचखोरीच्या आरोपाची चौकशी करण्यात येणार असून, त्यासाठी चार वरिष्ठ अधिकारी बुधवारी मुंबईला रवाना होणार असल्याचे समजते. या चौकशीमुळे वानखेडे यांच्या बदलीची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र अशाच आता एनसीबीच्या महासंचाकलांनी महत्वाची माहिती दिली आहे. वानखेडे यांची बदली करायची की नाही यासंदर्भातील कोणताही निर्णय हा ठोस पुरावे उपलब्ध असतील तरच घेतला जाईल. पुराव्यांच्या आधारेच वानखेडे यांच्या बदलीबद्दल अंतीम निर्णय घेण्यात येणार असल्याचं महासंचालक असणाऱ्या एन. सी. प्रधान यांनी स्पष्ट केल्याचं न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

आज एनसीबीचं पथक मुंबईत…
समीर वानखेडे यांच्या विभागीय चौकशीसाठी उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग आणि त्यांचे विभागीय संचालक दर्जाचे तीन सहकारी आज दिल्लीहून मुंबईला येणार आहेत. हे अधिकारी या प्रकरणाचे साक्षीदार किरण गोसावी व प्रभाकर साईल या दोघांचीही चौकशी करणार आहेत. प्रभाकर साईल जो या प्रकरणामध्ये छापा टाकाताना एनसीबी सोबत असणाऱ्या किरण गोसावीच्या गाडीचा चालक होता, त्याने वानखेडेंवर खंडणी मागितल्याचा धक्कादायक आरोप केलाय. साईलने केलेल्या आरोपानुसार हे प्रकरण मिटवण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागण्यात आली होती. आर्यनला मुक्त करण्यासाठी एनसीबी अधिकाऱ्यांनी ही खंडी मागितली होती. यामध्ये साईलने वानखेडेंचंही नाव घेतलं होतं. मात्र वानखेडेंनी हे आरोप फेटाळून लावलेत.

दिल्ली दौरा वेगळ्या करणासाठी…
दिल्लीमध्ये मंगळवारी वानखेडेंनी एनसीबीच्या महासंचाकलांची भेट घेतली. काल रात्रीच वानखेडे मुंबईत परतल्याचं सांगितलं जात आहे. आपल्याला कोणतेही समन्स देण्यात आलेले नाही, असं वानखेडेंनी यापूर्वीच स्पष्ट केलं असून आपण वेगळ्या कारणानिमित्त दिल्लीत आलो आहोत, असं ते म्हणाले होते. “दिल्लीत येण्यामागील कारण वेगळं आहे. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. सध्या तपास सुरु असल्याने या बद्दल मी काहीही बोलू इच्छित नाही, मी सर्व गोष्टींना योग्य वेळी उत्तर देईन,” असं वानखेडे म्हणाले होते.

दीड तासांच्या भेटीनंतर वानखेडे मुख्यालयातून निघाले…
मुंबईत क्रुझवरील अमली पदार्थ पार्टी प्रकरणातील साक्षीदार व पंच प्रभाकर साईल याने लाचखोरीचा आरोप केला असून, त्यात वानखेडेंचाही समावेश असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे वादात सापडलेल्या वानखेडे यांना ‘एनसीबी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्लीत बोलावून घेतले होते. वरिष्ठांच्या आदेशामुळे वानखेडे यांनी सोमवारी रात्री दिल्ली गाठली. मात्र, आपण ‘एनसीबी’च्या नियमित बैठकीसाठी आल्याचे त्यांनी सांगितले होते. मंगळवारी सकाळी वानखेडे यांनी ‘एनसीबी’च्या मुख्यालयात वरिष्ठांची भेट घेतली. सुमारे दीड तासांच्या भेटीनंतर वानखेडे मुख्यालयातून निघून गेले. वानखेडेंना पाठिंबा देण्यासाठी मुख्यालयासमोर समर्थकांनी गर्दी केली होती.

प्रभाकर साईलचा जबाब नोंदवणार
अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एसीबी) शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या विरोधात केलेल्या कारवाईबद्दल आरोप करणारे एनसीबीचे पंच प्रभाकर साईलचा एनसीबी जबाब नोंदवणार आहे. हा जबाब गुरुवारी नोंदण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या पथकाकडून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा आज जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील ८ कोटी रुपये अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप एनसीबीचे पंच प्रभाकर साईलने केला होता.

आर्यन-अनन्यामधील कथित संभाषण
आर्यन खान व अनन्या पांडे यांचे कथित संभाषण उघड झाले असून त्यात ते अमलीपदार्थांबद्दल संभाषण करत असल्याचे दिसून येत आहे. या कथित चॅटमध्ये अमलीपदार्थांसह एनसीबीचाही उल्लेख केला आहे. त्यात कोकेन व वीड(गांजा) सारख्या शब्दांचा उल्लेख आहे. याबाबत एनसीबीला विचारले असता त्यांच्याकडून याबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-10-2021 at 07:38 IST