“इथून पुढे मी….”, नवाब मलिकांच्या आरोपांनंतर अभिनेत्री क्रांती रेडकरची संतप्त प्रतिक्रिया!

समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरनं नवाब मलिक यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका करणारं सूचक ट्वीट केलं आहे.

kranti redkar
संग्रहीत छायाचित्र

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सातत्याने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर टीकासत्र सुरू ठेवलं आहे. कॉर्टेलिया क्रूजवर समीर वानखेडे यांनी टाकलेल्या छाप्यापासून थेट समीर वानखेडेंच्या धर्मापर्यंत अनेक बाबींवर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात आज देखील नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन काशिफ खान यांना समीर वानखेडेंनी मुद्दाम अटक केली नसल्याचा दावा केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर हिने ट्विटरववरून सूचक प्रतिक्रिया देत निशाणा साधला आहे.

काय म्हणाली क्रांती रेडकर?

क्रांती रेडकरनं आपल्या ट्वीटमध्ये कुणाचंही नाव न घेता अप्रत्यक्षपणे नवाब मलिक यांच्यावरच निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. “रोज माध्यमांवर केलेल्या कुणाच्यातरी निरर्थक विधानांवर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही. माझ्याकडे इतरही अनेक महत्त्वाची कामं करण्यासाठी आहेत. आता इथून पुढे मी फक्त कायदेशीर पद्धतीनेच व्यक्त होईन. माझा फक्त भारताच्या राज्यघटनेवर विश्वास आहे”, असं ती म्हणाली.

नवाब मलिक यांचे आरोप

आज सकाळी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईतील क्रूझ पार्टीच्या आयोजकांपैकी एक असणाऱ्या काशीफ खानला अटक झाल्यानंतर सखोल चौकशीमध्ये अनेकांची नावं समोर येतील. अनेकांच्या चेहऱ्यावरील मुखवटा हटेल. त्याच्याकडे किती लोकांचा पैसा आहे. त्याच्या माध्यमातून काय काय होतं आणि कोणत्या गोष्टी चालतात हे सुद्धा समोर येईल, असंही मलिक म्हणाले आहेत.

नवाब मलिकांच्या आरोपांवर काशिफ खान यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी कधीही…!”

गुन्हा सिद्ध झालेला नसताना तुरुंगात ठेवणं हा अन्याय असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीचा फोटो मला रात्री दोन वाजता पाठवण्यात आला. हा फोटो ज्यांच्या आहे त्यांनी तो माझ्या माध्यमातून समोर यावा अशी इच्छा व्यक्त केली होती म्हणून मी तो सकाळी पोस्ट केला. मी समीर वानखेडेंची सध्याच्या पत्नीचं नाव कधीही घेतलं नाही, त्यांच्याबद्दल कधीही काहीही व्यक्तव्य केलं नाही. माझी लढाई ही परिवार, धर्माविरोधात नाहीय. आजही मुंबईतील तुरुंगामध्ये १०० हून अधिक लोक हे चुकीच्या पद्धतीने अटक करुन डांबण्यात आलेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sameer wankhede wife actress kranti redkar slams on nawab malik allegations pmw

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा