समीर वानखेडे प्रकरण: हल्ली बायका पण असा चोमडेपणा करत नाहीत; क्रांती रेडकर नवाब मलिकांवर संतापली

सोशल नेटवर्किंगवर आम्हाला ठरवून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप क्रांती रेडकर आणि जास्मिन वानखेडे यांनी केला आहे.

nawab malik sameer wankhede wife
पत्रकार परिषदेमध्ये क्रांतीने स्पष्ट केली तिची भूमिका

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी क्रांतीने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून मागील काही दिवसांपासून सुरु असणारे आरोप आणि ट्विटरवरील पोस्टवर आक्षेप नोंदवला. तसेच तिने हा सारा प्रकार म्हणजे बायकांसारखा चोमडेपणा वाटतोय असा टोलाही अप्रत्यक्षपणे लगावला आहे.

ट्विटरवरुन काल नबाव मलिक यांनी समीवर वानखेडेंचा जन्मदाखला आणि पहिल्या लग्नाचा फोटो पोस्ट केला होता. मात्र यावरुन क्रांतीने कालच सोशल मीडियावरुन स्पष्टीकरण दिलं होतं. आज पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता क्रांती संतापली. आज काल बायका पण असं वागत नाहीत. हे किचनमधील पॉलिटिक्स, चोमडेपणा केल्यासारखं आहे. एक ट्विटरसारखं माध्यम आहे तर उद्या कोणीही उठून काहीही लिहील. आम्ही तुमचा सन्मान करतो. तर तुम्ही तसं वागा, असा खोचक सल्ला क्रांतीने नबाव मलिक यांना दिला.

समीर तिथून हटले तर कोणाचा फायदा होणार हे शोधलं पाहिजे. ज्या पद्धीने समीर यांच्याबद्दलची माहिती काढली जातेय त्यासाठी पैसे लागतात. हे काही ड्रग्ज पेडलर्सचं वगैरे काम नाहीय. यासाठी प्रायव्हेट डीटेक्टीव्ह वगैरे लागतात. एवढं पैसे टाकतायत तर काहीतरी हेतू असणार, अशी शंकाही क्रांतीने बोलून दाखवली. तर समीर यांची बहीण जास्मिन वानखेडे यांनी या प्रकरणामध्ये पेड लॉबी आहे असं आम्हाला कळाल्याचं प्रसार माध्यमांना सांगितलं.

तसेच सोशल नेटवर्किंगवर आम्हाला ठरवून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप क्रांती आणि जास्मिन यांनी केला. रोज आम्हाला शिव्या दिल्या जातात, वाईट बोललं जातं असल्याचे प्रकार आमच्यासोबत सोशल नेटवर्किंगवर सुरु आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे ओपनली होत आहे आणि आम्ही काहीच करु शकत नाही, असं क्रांती म्हणाली.

तसेच जन्मदाखल्यावरुन सुरु असणाऱ्या गोंधळावरही या दोघींना भाष्य केलंय. त्यांनी म्हटलं की जन्माच्या दाखल्यापासून सुरु होतो गोंधळ असं ते म्हणाले. मात्र समीर यांच्या रिलिजन, कास्टबद्दल सगळी कागदपत्रं आम्ही दिली आहेत. सरकारी कागदपत्रं हाच भारतात सर्वात मोठा पुरावा असतो, असंही क्रांती म्हणालीय.

समीर वानखेडे यामधून नक्कीच बाहेर पडतील. आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे, असं जास्मिन यांनी म्हटलं आहे. तसेच अद्याप आम्ही पोलीस स्थानकात तक्रार केलेली नाहीय, असंही जास्मीन म्हणाल्या आहेत. मात्र त्याच वेळी क्रांतीने आम्ही पोस्टवर कमेंट करणाऱ्यांचे स्क्रीनशॉर्ट घेतलेत. ती सर्व खोटी अकाऊंट असल्याचं दिसत आहे. कोणती तरी पीआर यंत्रणा आहे जी हे काम करतेय. कोण डेथ थ्रेट देतात याचे स्क्रीनशॉर्ट आम्ही संबंधित यंत्रणांकडे दिले आहेत. जो कोण धमकावण्याचा प्रयत्न करतोय त्याचा पर्दाफाश होईल, असा विश्वास व्यक्त केलाय.

मालदिवमध्ये बॉलिवूडचे कोण लोक होते हे आम्हाला तरी सांगा, असं जास्मिन यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांवर म्हटलं आहे. तसेच तिकडे आम्ही आम्ही दोघी एकत्र गेलो नव्हतो. आम्हाला एकही सेलिब्रेटी दिसली नाही. ते बकवास करत असल्याचा टोला जास्मिन यांनी लगावला.


Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sameer wankhede wife kranti redkar slams nawab malik says he is talking like women are gossiping scsg

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या