समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर केलेले आरोप निराधार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. रामदास आठवले म्हणाले, “नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर सर्व प्रकारचे बिनबुडाचे आरोप केले आहेत. ते आमच्या समाजाची बदनामी करत आहेत. समीरच्या वडिलांचे नाव दाऊद नाही. मी त्यांची सर्व कागदपत्रेही पाहिली आहेत.”

यावेळी बोलताना क्रांती रेडकर यांनी म्हटलं की, “माझ्या पतीचा लढा अमली पदार्थांविरुद्ध आहे, कोणत्याही धर्म किंवा जातीविरुद्ध नाही. आपल्या पतीवर आणि तिच्या कुटुंबावर होत असलेल्या आरोपांचा देत क्रांती रेडकर म्हणाल्या की, समीर वानखेडेंचा त्यांच्या कामाप्रती असलेला निश्चय कमी झालेला नाही. समीर वानखेडे यांचा लढा अमली पदार्थांविरुद्ध आहे, कोणत्याही धर्माविरुद्ध नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आमच्या कुटुंबासोबत  जे काही घडले आहे, त्यात त्यांचा कामाप्रती निश्चय कमी झालेला नाही. लोक समीरला खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना त्यात यश येणार नाही. असे झाल्यास लोक एनसीबी या यंत्रणेवरील विश्वास गमावतील,” असं क्रांती रेडकर म्हणाल्या.

“हा न्यायाचा लढा आहे. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पाठिंबा मागितला होता, मला फोन आला तर मी जाऊन भेटेन. मात्र नवाब मलिक यांनी लावलेल्या विविध आरोपांवर मी आता भाष्य करणार नाही,” असे क्रांतीने म्हटलं.