मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ही यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. या कामाअंतर्गत सिन्नर आंतरबदल मार्गिका ते इगतपुरी आंतरबदल मार्गिकेदरम्यान गॅन्ट्री बसविण्यात येणार आहे. हे काम ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान केले जाणार आहे. त्यामुळे या कालावधीदरम्यान सिन्नर – इगतपुरी टप्प्यात वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार असून या कालावधीत वाहतूक पूर्णतः बंद असणार आहे.

एमएसआरडीसीच्या ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गामुळे नागपूर मुंबई प्रवास आता केवळ आठ तासांत करता येत आहे. या समृद्धी महामार्गावरील वाहतुकीचे नियमन अत्याधुनिक पद्धतीने करता यावे यासाठी या महामार्गावर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) कार्यान्वित करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. ही यंत्रणा बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यानुसार ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान सिन्नर आंतरबदल मार्गिका ते इगतपुरी आंतरबदल मार्गिका या टप्प्यात आयटीएमएसच्या कामाअंतर्गत गॅन्ट्री बसविण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे.

एमएसआरडीसीने दिलेल्या माहितीनुसार ३१ ऑगस्ट, १ आणि २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते १ दरम्यान सिन्नर आंतरबदल मार्गिका ते भरवीर आंतरबदल मार्गिकेदरम्यान मुंबईच्या दिशेने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर नागपूरच्या दिशेने या टप्प्यादरम्यान दुपारी ३ ते ४ या वेळेत वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर ४ ते ७ सप्टेंबरदरम्यान दुपारी १२ ते १ पर्यंत भरवीर आंतरबदल मार्गिका ते इगतपुरी आंतरबदल मार्गिकेदरम्यान मुंबईच्या दिशेने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर दुपारी ३ ते ४ या वेळेत नागपूरच्या दिशेने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. वाहतूक ब्लॉकच्या कालावधीत वाहतूक पूर्णतः बंद असेल. वाहतूक ब्लॉक संपल्यानंतर वाहतूक पूर्ववत होईल. त्यामुळे ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासाचे योग्य ते नियोजन करावे, असे आवाहन एमएसआरडीसीकडून प्रवाशांना करण्यात आले आहे.