मुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा गुरुवारी वाहतूक सेवेत दाखल झाला असला तरी आधीचे दोन टप्पे यापूर्वीच वाहतूक सेवेत दाखल झाले आहेत. डिसेंबर २०२२ ते १ जून २०२५ पर्यंत या महामार्गावरून दोन कोटी ११ लाख ३४ हजार ३२२ वाहनांनी प्रवास केला आहे, तर या वाहनांच्या माध्यमातून पथकराच्या रूपाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) तिजोरीत १,५३० कोटी रुपयांची भर पडली आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या या महामार्गावरून महिन्याला १० लाख वाहने प्रवास करत आहेत.

मुंबई ते नागपूर अंतर पार करण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला. या महामार्गातील नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये, तर शिर्डी ते भरवीर असा ८० किमीचा टप्पा मे २०२३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. भरवीर ते इगतपुरी या २५ किमीच्या टप्प्याचे लोकार्पण मार्च २०२४ मध्ये झाले. नागपूर ते इगतपुरीदरम्यान एकूण दोन कोटी ११ लाख ३४ हजार ३२२ वाहनांनी प्रवास केल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

समृद्धीवर धावलेली वाहने

हलकी चारचाकी : १,००,४७,०००

मिनी बस-हलकी व्यावसायिक वाहने : ६,७०,०००

बस-ट्रक : २१,४५,०००

तीन आसांच्या व्यावसायिक वाहने : ६,७६,०००

४-६ आसांची वाहने : २८,८०,०००

७ आसांपेक्षा अधिक आसांची वाहने : ८,४०० अशी आहे.

महिन्याला १० लाख वाहने

काही महिन्यांपूर्वी या महामार्गावरून महिन्याला दोन लाख वाहने धावत होती. मात्र आता या महामार्गाला मिळणारा प्रतिसाद वाढत असून सध्या महिन्याला १० लाख वाहने प्रवास करत असल्याचेही ‘एमएसआरडीसी’कडून सांगण्यात आले. आता नागपूर ते मुंबई असा संपूर्ण ७०१ किमीचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्याने समृद्धी महामार्गाला मिळणारा प्रतिसाद आणखी वाढणार असल्याचा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चारचाकी वाहनांसाठी १४४५ रुपये पथकर

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे हा ७६ किमीचा शेवटचा टप्पा गुरुवारी वाहतूक सेवेत दाखल झाला. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्याने आता नागपूर ते मुंबई अंतर १६ तासांऐवजी केवळ आठ तासांत पार करता येणार आहे. मात्र या अतिजलद प्रवासासाठी वाहनचालक-प्रवाशांना १,४४५ रुपये पथकर मोजावा लागणार आहे.