मुंबई – नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरून अतिजलद येणाऱ्या वाहनांना आमणे येथे वाहतूक कोंडीत अडकावे लागते. दक्षिण मुंबईत पोहोचण्यासाठी किमान दोन तास खर्ची करावे लागतात. पण भविष्यात समृद्धीवरून येणाऱ्या वाहनांचा प्रवास आमणे ते दक्षिण मुंबई असा थेट, वाहतूक कोंडीमुक्त आणि केवळ एका तासात होणार आहे. समृद्धीवरून येणाऱ्या वाहनांना आमणेवरून थेट दक्षिण मुंबईत अतिजलद जाता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) आमणे आणि दक्षिण मुंबईला जोडणारा नवीन जोडरस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

या जोडरस्त्याचे संरेखन निश्चित करण्यात आले असून खारबाव ते अंगाव असा १६.६९ किमीचा हा जोडरस्ता असणार आहे. या जोडरस्त्यासाठी २४१५.४९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून संरेखनाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

एमएसआरडीसीच्या ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गामुळे नागपूर-मुंबई प्रवास आठ तासांत करता येत आहे. आजच्या घडीला या महामार्गावरून मोठ्या संख्येने वाहने धावतात. मात्र समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टोकावर अर्थात आमणे येथे आल्यानंतर पुढे दक्षिण मुंबईत जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावतो. वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते आणि आमणे ते दक्षिण मुंबई प्रवासासाठी दोन तास वा त्यापेक्षा अधिक वेळ खर्ची करावा लागतो. त्यामुळे एमएसआरडीसीने नागपूर ते दक्षिण मुंबई प्रवास थेट आणि अतिजलद करण्यासाठी, आमणे ते दक्षिण मुंबई अंतर केवळ एका तासात पार करता यावे यासाठी आमणेला थेट दक्षिण मुंबईशी जोडणारा नवीन रस्ता बांधण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला दिले होते. या आदेशानुसार एमएसआरडीसीने सल्लागाराच्या माध्यमातून संरेखनाचे काम हाती घेतले.

पाच संरेखनापैकी एक संरेखन निश्चित

सल्लागाराने पाच पर्यायी संरेखनांचा अभ्यास केला. तांत्रिक, आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय निकषांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर त्यातून एक पर्याय अर्थात संरेखन निश्चित करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला दिली. निश्चित संरेखनानुसार खारबाव ते अंगाव असा १६.६९ किमी लांबीचा आठ पदरी, प्रवेश नियंत्रित असा हा जोडरस्ता असणार आहे. या जोडरस्त्याला खारबाव, शेलार आणि अंगाव अशा तीन आंतरबदल मार्गिका असणार आहेत. या प्रकल्पासाठी १७२५.३५ कोटी रुपये असा बांधकाम खर्च अपेक्षित असून एकूण खर्च २४१५.४९ कोटी रुपये अपेक्षित आहे. हा जोडरस्ता मुंबई- वडोदरा महामार्ग, ठाणे सागरी किनारा मार्गाला आणि समृद्धी महामार्गाला जोडणार आहे. त्यामुळे वाहनांना भविष्यात सागरी मार्ग, सागरी सेतूद्वारे थेट दक्षिण मुंबईत पोहोचता येणार आहे. ठाणे, भिवंडी अथवा मुंबई शहरात येण्याची गरज वाहनांना पडणार नाही. त्यामुळे नागपूर – दक्षिण मुंबई प्रवास थेट आणि अतिजलद करता येणार आहे. अशा या प्रकल्पाचे संरेखन निश्चित करून संरेखनाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.