मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर आज दुपारी ४५ ते ६० मिनिटांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गावर इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) यंत्रणा विकसित केली जात आहे. या कामासाठी जालनादरम्यान महामार्गावर आज गॅन्ट्री उभारणीचे काम करण्यात येणार आहे.

या कामासाठी दुपारी १ ते २ या वेळेत ४५ ते ६० मिनिटांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली आहे. एमएसआरडीसीकडून ७०१ किमीचा नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग चार टप्प्यांत वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला आहे. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास अतिजलद झाला आहे.

अशा या महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापनाचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यानुसार आयटीएमएस यंत्रणा बसविण्याचे काम सध्या एमएसआरडीसीकडून सुरू आहे. या कामासाठी महामार्गावरील जालना येथील साखळी क्रमांक ३५१/९०० दरम्यान आज दुपारी गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे.

या कामासाठी दुपारी १ ते २ या वेळेत ४५ ते ६० मिनिटांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत येथील वाहतूक पूर्णतः बंद राहील. वाहतूक ब्लॉकदरम्यान वाहतूक इतर पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही एमएसआरडीसीकडून करण्यात आले आहे. गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर येथील वाहतूक पूर्ववत होईल.