मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरून येणार्या वाहनांचा आमणेवरून पुढे थेट दक्षिण मुंबईत येता यावे यासाठी राज्य सरकारने आणखी एक रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १८ किलोमीटरचा रस्ता बांधण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता आमणे- साकेत दरम्यान २१.३ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ६,२०२ कोटी रुपये खर्चाच्या या उन्नत मार्गासाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून नव्या रस्त्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. प्राधिकरणाच्या सोमवारच्या बैठकीत या उन्नत मार्गाच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला आणि प्रकल्प खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. समृद्धी महामार्गावरून अतिजलद येणार्या वाहनांना आमणेनंतर वाहतूक कोंडीत अडकावे लागते, तर पुढे दक्षिण मुंबईत जाण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात.
या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागू नये आणि भविष्यात दक्षिण मुंबईत अतिजलद जाता यावे यासाठी राज्य सरकारने ठाण्यात खारेगावपासून पुढे मुंबई- बडोदा द्रुतगती महामार्ग जंक्शनपर्यंत १८ किलोमीटरचा नवीन रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. या मार्गाची आखणी सुरू असून या मार्गाची जबाबदारी एमएसआरडीसीकडे सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. या मार्गामुळे पुढे उत्तन- विरार सागरी मार्ग, दहिसर- भाईंदर सागरी किनारा मार्गाने पुढे वांद्रे – वर्सोवा सागरी सेतू, वांद्रे- वरळी सागरी सेतूने पुढे सागरी मार्गाने नरिमन पॉईंटला पोहोचता येणार आहे.आता समृद्धीच्या शेवटच्या आमणे टोकावरून दक्षिण मुंबईत पोहोचता यावे यासाठी एमएमआरडीएनेही पुढाकार घेतला आहे. त्यानुसार एमएमआरडीएने आमणे- साकेत दरम्यान २१.३ किमी लांबीचा उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
मार्ग कसा असेल?
आमणे येथून हा उन्नत मार्ग सुरू होईल आणि साकेतला येऊन पोहोचेल. त्यानंतर पुढे साकेत- आनंदनगर उन्नत मार्गाने पुढे छेडानगर उड्डाणपूल, पूर्व मुक्त मार्गाने ऑरेंज गेट- मरिन ड्राईव्ह दुहेरी बोगद्यातून मरिन ड्राइव्हला पोहोचता येईल. दोन ते अडीच तासांचा हा प्रवास
भविष्यात एका तासात करता येईल. भविष्यात या उन्नत मार्गाने विरार, भाईंदरवरून सागरी सेतू, सागरी किनारा मार्गाने दक्षिण मुंबईत येता येणार आहे. या उन्नत मार्गात सहा अंतरबदल मार्गांचा समावेश आहे. त्यामुळे खारेगाव येथून भविष्यात विरार – अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेवरून प्रवास करता येईल. तर ठाणे खाडी किनारा मार्गावरही जाता येईल.

