मुंबई : मुंबईतील एका हॉटेलमध्ये दशकभरापूर्वी कुख्यात गुंड संवरदीप गडोली याच्या कथित बनावट चकमकीप्रकरणी हरियाणा पोलीस दलातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षकासह पाच कर्मचाऱ्यांची कनिष्ठ न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष सुटका केली.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रशांत काळे यांनी आरोपींना हत्या आणि इतर आरोपांतून निर्दोष सुटका केली. अंधेरी पूर्व येथील एका हॉटेलमध्ये ७ फेब्रुवारी २०१६ रोजी गुरुग्राम पोलिसांनी केलेल्या कथित गोळीबारात गडोली मारला गेला होता. गडोलीवर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते आणि १९९९ पासून त्याच्याविरोधात ४० हून अधिक गुन्हे दाखल होते.

या हत्येप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. यात पाच पोलीस कर्मचारी, गडोलीची प्रेयसी दिव्या पहुजा (मृत), तिची आई आणि प्रतिस्पर्धी टोळीचा म्होरक्या वीरेंद्र गुर्जर यांचा समावेश होता. आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तत्कालीन उपनिरीक्षक प्रद्युम्न यादव, विक्रम सिंग, जितेंद्र यादव, दीपक काकरान आणि परमजीत अहलावत यांचा समावेश होता.

पोलिसांच्या आरोपांनुसार, पहुजा हिच्या मदतीने गडोलीला जाळ्यात ओढण्यात आले होते आणि एका बनावट चकमकीत त्याची हत्या करण्यात आली होती. गडोली जामिनावर असतानाच २०२४ मध्ये हरियाणातील एका हॉटेलमध्ये दिव्या पहुजाची हत्या करण्यात आली; त्यानंतर पहुजाविरुद्धचा खटला संपुष्टात आला. गडोलीशी पूर्ववैमनस्य असलेल्या गुर्जर यानेच मुंबईतील हॉटेलमध्ये कथित चकमकीचे सूत्रसंचालन केले होते.

आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांनी हॉटेलमध्ये बेकायदेशीर शस्त्रांचा वापर करून गडोलीवर गोळीबार केला आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी खोटे पुरावे सादर केले, हे सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने ४३ साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरण, कॉल नोंदी आणि न्यायवैद्यक अहवाल यांसारखे विस्तृत तांत्रिक पुरावे न्यायालयासमोर सादर केले होते.