मुंबई : संगमेश्वर तालुक्यातील मौजे कोंडीवरे येथील कणकीचे सपाट परिसरातील शेताभोवती लावलेल्या विद्युत तारांचा धक्का बसून दोन कोळसुंद्यांचा (रानकुत्रे) मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. दरम्यान, एक मादी व एक नर अशा दोन कोळसुंद्याचे मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले.

स्थानिक रहिवासी दिनेश राजाराम कदम यांनी १९ नोव्हेंबर रोजी वन विभागाला दिलेल्या माहितीच्या आधारे पथकाने घटनास्थळी भेट दिली. तपासादरम्यान कोळसुंद्यांचे मृतदेह घटनास्थळी आढळले नाहीत. चौकशीअंती साबुदाणा बागेवर देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मृत कोळसुंद्यांना बागेतील खड्ड्यात पुरल्याचे मान्य केले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खड्डा उकरून दोन कोळसुंद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी जप्त केले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शेटे, डॉ. बेलुरे व डॉ. सोनाली शेटे यांनी त्यांचे शवविच्छेदन केले असून, ही संपूर्ण कारवाई विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी प्रकाश सुतार आणि त्यांच्या पथकाने केली. तसेच स्थानिक पोलीस पाटील व ग्रामस्थांनीही सहकार्य केले.

दरम्यान, या प्रकरणी केरळमधील कन्नूरचा जॉर्ज पी. व्ही. आणि उत्तर प्रदेशातील लखीमपूरचा घनःश्याम (दोघेही सध्या राहणार कोंडीवरे) यांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. शेताभोवती लावलेली विद्युत तार, झटका मशीन, बॅटरी, वायर, चिमटा वायर, फावडा आदी साहित्य जप्त करण्यात आले असून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

‘कोळसुंदे’विषयी

संकटग्रस्त यादीत मोडणाऱ्या कोळसुंद्यांना कोकणात कोळिस, कोळशिंदे आदी नावाने ओळखले जाते. पूर्वी सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यांना लागून असणाऱ्या कोकणातील गावांमध्ये या प्रजातीचा अधिवास होता. कालांतराने कोळसुंद्यांचा अधिवास कोकणातील किनारी भागातही आढळू लागला. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत संरक्षित असून, यांना जखमी करणे, त्रास देणे, मारणे किंवा पकडणे गुन्हा आहे. कोळसुंदे प्रामुख्याने जंगल, डोंगराळ भाग, शेत आणि झुडपांमध्ये आढळतात. ते आकाराने मांजरापेक्षा मोठे असतात. शरीरावर करड्या किंवा तपकिरी रंगाच्या रेषा असतात. शेपटीवर काळे-पांढरे पट्टे असतात. त्यांचे डोळे टपोरे, नाक टोकदार आणि शरीर लवचिक असते. ते रात्री सक्रिय असतात.