|| नमिता धुरी, मानसी जोशी
सार्वजनिक शौचालयांत यंत्रणा बसवण्यात अपयश; उपलब्ध यंत्रणाही बंद अवस्थेत :- मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांची सार्वजनिक ठिकाणी होणारी गैरसोय कमी व्हावी यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने २३५ सार्वजनिक शौचालयांमध्ये ‘सॅनिटरी व्हेंडिंग मशीन’ आणि ‘इन्सिनरेटर’ बसवणार असल्याचे जानेवारीत जाहीर केले होते. ही यंत्रे आणि त्यांची देखभाल यासाठी ३ कोटींची तरतूदही केली होती.मात्र अंमलबजावणीच्या पातळीवर ही योजना पुरती फसल्याचे दिसत आहे. अनेक शौचालयांमध्ये अद्याप ही यंत्रे बसवण्यात आलेली नाहीत. शिवाय काही ठिकाणी उपलब्ध असलेली यंत्रेही कित्येक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत.
दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी मुंबईभरातील महिलांचा वावर असतो. त्यांची कुचंबणा होऊ नये म्हणून केशवसुत उड्डाण पुलाखाली पालिकेने दोन सार्वजनिक शौचालये उभारली आहेत. मात्र एकाही शौचालयात सॅनिटरी व्हेंडिंग मशीनच उपलब्ध नाही. तेथील व्यवस्थापकाने सॅनिटरी पॅड्ससाठी एक साधा डबा बसवला आहे. मात्र तोसुद्धा बऱ्याच दिवसांपासून रिकामा आहे.
फोर्ट येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह येथे भेट देण्यासाठी स्थानिक तसेच परदेशी महिला पर्यटक येत असतात. त्यांच्या सोयीसाठी जवळच सुलभ शौचालय उभारण्यात आले आहे. परंतु येथील सॅनिटरी व्हेंडिंग मशीनसोबतच इन्सिनरेटर हे पॅडनाशक यंत्रही बंद आहे. बोरिवलीपासून नरिमन पॉइंटपर्यंत बऱ्याच सार्वजनिक शौचालयांची हीच अवस्था आहे.
यंत्रांची कार्यपद्धत
सॅनिटरी व्हेंडिंग मशीनमध्ये पाच रुपयांचे नाणे टाकल्यावर एक सॅनिटरी पॅड बाहेर येते. यानंतर वापरलेल्या पॅडच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर असतो. पॅड कचराकुंडीत टाकल्यास कचरावेचक महिलांच्या आरोग्याला धोका असतो. काही वेळा कचराकुंडी उपलब्ध नसल्यास महिला वापरलेले पॅड शौचकुपात टाकतात. यामुळे शौचालय तुंबते व अस्वच्छता पसरते. त्यामुळे इन्सिनरेटर हे पॅडनाशक यंत्र सार्वजनिक शौचालयांमध्ये बसवण्यात आले आहे. त्यात पॅड टाकल्यास ते जळते व त्याचा धूर बाहेर फेकला जातो. यामुळे सॅनिटरी पॅडची सुरक्षितपणे विल्हेवाट लावली जाते.
शौचालये असूनही..
सार्वजनिक शौचालयांमधील प्रश्न हे ‘सॅनिटरी नॅपकिन’पुरते मर्यादित नाहीत. अनेक ठिकाणी शौचालयांच्या बाहेर फेरीवाल्यांची रांग लागलेली असते. त्यामुळे शौचालयाचे द्वार महिलांच्या नजरेस पडत नाही. तसेच पुरुष फेरीवाल्यांचा घोळका टाळण्यासाठीही महिला या शौचालयांकडे दुर्लक्ष करतात. येथील पुरुष व्यवस्थापक आपल्या माणसांना महिला शौचालयांचा वापर करण्याची मुभा देतात. त्यामुळे शौचालयात जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. दादरच्या केशवसुत उड्डाण पुलाखालील शौचालयात पुरुषांसाठी आठ, तर महिलांसाठी फक्त दोन शौचालये आहेत. सशुल्क शौचालयांमध्येही महिलांना स्वच्छतेची हमी मिळत नाही. शौचालय स्वच्छ आढळल्यास किमान दरुगधीचा सामना तरी करावाच लागतो.
सुलभ शौचालयात ‘सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन’ आणि ‘इन्सिनरेटर’ बसवण्याची योजना नुसती नावापुरती आहे. या यंत्राची आवश्यक देखभाल केली जात नाही. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी ही यंत्रे बंद असून त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मात्र पालिकेचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. – शालिनी ठाकरे, सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना</strong>
