मुंबई: ‘मी पाच जणांना ठार केले आहे. त्यामुळे माझ्याविरोधात आंदोलन केल्यास बॉम्ब टाकून मारेन, अशी आंदोलकांना धमकी देणारे ठाकरे गटाचे बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे तक्रार केली आहे. ‘पत्रकारांचा अवमान योग्य नाही. चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करा, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील यांना दिला आहे.
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला होता. संजय राऊत यांच्या विधानांवर पाटील यांनी काही इशारे दिले होते. या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी खासदार पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी दमदाटीची भाषा केली होती. बघून घेईन, परत आला तर सोडणार नाही. कुठेही तक्रार करा, अशी मग्रुरीची भाषा खासदार पाटील यांनी केली होती. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही पाटील यांची सर्व वक्तव्ये दहशतवाद, गुन्हेगारी कृत्यात सहभागी होण्याचे पुरावे आहेत. त्यामुळे पाटील यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
खासदार संजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना ‘माझ्या नादाला लागू नका, माझ्या विरोधात आंदोलन करण्याआधी जीवाचा विमा काढा, नाहीतर सरळ स्मशानात पाठवीन,’ तसेच ‘मी याआधी पाच जणांना ठार केले आहे’ आणि ‘आंदोलन केल्यास बॉम्ब टाकून घरात घुसून मारेन’ अशा स्वरूपाची विधाने केली आहेत. या विधानांची चौकशी करून तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे. अशा परिस्थितीत आंदोलकांना धमकावणे हा नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर घाला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
शिंदे यांची सावध भूमिका
खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांची मी माहिती घेतली आहे. त्यांचा राग हा अर्वाच्च आणि खालच्या दर्जाची भाषा वापरणाऱ्यांच्या विरोधात आहे. त्यांंना पत्रकारांबद्दल काही वाईट बोलायचे नव्हते. तरीही दिलगिरी व्यक्त करण्याचा मी सल्ला त्यांना दिल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
