संजय दत्तला मुंबईतील कारागृहातच ठेवायचे की अन्यत्र हलवायचे याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. किंवा त्याला हलविण्याची तूर्तास तरी कुठलीही योजनाही नसल्याने संजयचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम आणखी काही दिवस वाढणार आहे.
संजय दत्तला शिक्षा भोगण्यासाठी अन्य कारागृहात हलविण्याबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. परंतु येते काही दिवस तरी त्याला आर्थर रोड कारागृहातून हविण्यात येणार नाही, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) मीरा बोरवणकर यांनी दिली.
संजयला निनावी पत्राद्वारे देण्यात आलेल्या कथित धमकीच्या पाश्र्वभूमीवर त्याला अन्य कारागृहात हलविण्यापूर्वी तेथील कैद्यांची संख्या, सुरक्षा व्यवस्थेची स्थिती, कोणत्या टोळीचे किती गुंड तेथे बंदिस्त आहेत आदींची माहिती मागविण्यात आली
आहे. त्याचा सुरक्षेच्या दृष्टीने अभ्यास करूनच संजयला अन्य कारागृहात हलवायचे की नाही याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे कारागृह प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
परकार- झैबुन्निसा काझीही अखेर शरण
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात शिक्षा झालेले पण मुदतीत हजर न झाल्याने टाडा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावलेले शरीफ परकार (८०) आणि झैबुन्निसा काझी (७५) यांनीही सोमवारी अखेर विशेष ‘टाडा’ न्यायालयासमोर शरणागती पत्करली. आरोग्याच्या कारणास्तव या दोघांनी सोमवापर्यंत मुदत मागितली होती. विशेष म्हणजे परकारला सोमवारी अक्षरश: स्टेचर, तर झैबुन्निसाला ‘व्हिल-चेअर’वरून न्यायालयात आणण्यात आले. परकारची अवस्था पाहून विशेष ‘टाडा’ न्यायालयाचे न्यायाधीश जी. ए. सानप यांनी त्याला काही वेळ शुद्ध हवेसाठी न्यायालयाबाहेर ठेवण्याच्या सूचना केल्या. परकार शरणागतीची मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात होता. तर कर्करोगग्रस्त झैबुन्निसा काही वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात होती.