१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अभिनेता संजय दत्तला महिनाभर आर्थर रोड कारागृहातच ठेवण्याची शक्यता आहे. संजय दत्तची तब्येत, घरच्या जेवणाची न्यायालयाने दिलेली सुविधा आणि सुरक्षेच्या कारणांमुळे त्याला महिनाभरानंतर राज्यातील अन्य कारागृहात हटविण्यात येऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
संजय दत्त १६ मे रोजी मुंबईतील सत्र न्यायालयापुढे शरण आला. सर्वोच्च न्यायालयाने त्याला शस्त्रास्त्र कायद्याखाली पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यापैकी १८ महिन्यांची शिक्षा त्याने भोगली असल्यामुळे आणखी साडेतीन वर्षे त्याला कारागृहात राहावे लागणार आहे. त्यासाठी त्याने न्यायालयापुढे शरणागती पत्करली.
शरण आल्यानंतर संजय दत्तला तातडीने पुण्यातील येरवडा कारागृहात हलविण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, संजय दत्तची तब्येत आणि त्याच्यावरील उपचार, दोन्ही वेळेला घरचे जेवण देण्याची न्यायालयाने दिलेली परवानगी आणि सुरक्षाव्यवस्था या मुद्द्यांमुळे त्याला महिनाभर आर्थर रोड जेलमध्येच ठेवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीये.