मुंबई बॉम्बस्फोटांप्रकरणी सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्त शिक्षा पूर्ण होण्याच्या दीड वर्ष आधीच म्हणजे जानेवरीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्यात संजय दत्त तुरूंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच याबाबतची चर्चा सुरू झाल्यानंतर संजय दत्तला विशेष वागणूक मिळत असल्याचे आरोप होण्यास सुरूवात झाली होती. मात्र, अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरूंग) भूषण उपाध्याय यांनी ‘नवभारत टाईम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्तला शिक्षेत मिळालेली सवलत नियमबाह्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. जेल मॅन्युअलच्या नियमानुसार प्रत्येक कैद्याला महिन्याला सात दिवसांची रजा माफ केली जाते. यानुसार कैद्याची वर्षभरात ८४ दिवसांची शिक्षा कमी होते. याशिवाय, कैद्याची तुरूंगातील वागणूक चांगली असेल तर प्रत्येक वर्षी आणखी ३० दिवसांची शिक्षा माफ केली जाते. या हिशेबाने संजय दत्तची वर्षाला ११४, तर पाच वर्षांत ५७० दिवसांची शिक्षा माफ करणे नियमाला धरून आहे. या व्यतिरिक्त तुरूंग अधीक्षकांना ३० दिवसांची, उपमहासंचालकांना ६० दिवसांची आणि अतिरिक्त पोलीस महासंचालकांना ९० दिवसांपर्यंत शिक्षा माफ करण्याचा अधिकार असतो.