मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यामध्ये झालेली शिक्षा भोगण्यासाठी संजय दत्त गुरुवारी अखेर ‘टाडा’ न्यायालयासमोर हजर झाला. परंतु शरणागती पत्करण्याआधी संजय दत्तने आजारपणाच्या कारणावरून कारागृहात अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याची यादीच न्यायालयासमोर सादर केली. त्यातील इलेक्ट्रॉनिक सिगारेटची मागणी वगळता घरचे जेवण, झोपण्यासाठी गादी-उशी, गार वाऱ्यासाठी पंखा आदी मागण्या न्यायालयाने मान्य केल्या. त्यामुळे कारागृहात दाखल होण्यापूर्वी काहीशा तणावाखाली असलेल्या संजयने सुटकेचा नि:श्वास सोडला.
शरणागतीच्या सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास संजयसह अन्य आरोपींना आर्थर रोड कारागृहाकडे नेण्याचा प्रवास सुरू झाला. दुपारी न्यायालयात दाखल होताना प्रचंड गर्दीमुळे संजयला झालेली धक्काबुक्कीमुळे सुरक्षेचा भाग म्हणून तसेच त्याला दुसऱ्या प्रवेशद्वाराने बाहेर काढण्यात आले. पोलिसांच्या गाडीतून त्याला आर्थर रोड कारागृहात नेण्यात आले. आर्थर रोड कारागृहात संजय दत्तची वैद्यकीय चाचणी करून त्याला शुक्रवारी सकाळी येरवडा कारागृहाकडे रवाना केले जाण्याची शक्यता आहे.