मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात पाच वर्षांची शिक्षा झालेल्या संजय दत्तने कारागृहात शरणागती पत्करण्याचा हट्ट सोडत आता न्यायालयासमोरच हजर होण्याचे ठरविले आहे. थोड्याच वेळात तो विशेष ‘टाडा’ न्यायालयासमोर शरणागती पत्करणार आहे. 
आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा करीत न्यायालयाऐवजी कारागृहातच शरणागती पत्करण्यास परवानगी द्यावी, यासाठी संजयने ‘टाडा’ न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतु संजयने बुधवारी हा अर्ज मागे घेण्याची परवानगी मागितली आणि गुरुवारी आपण न्यायालयासमोर शरण येऊ, असे कळविले. न्यायालयानेही त्याची अर्ज मागे घेण्याची विनंती मान्य केल्याने संजय गुरुवारी ‘टाडा’ न्यायालयासमोर शरगणागती पत्करणार आहे.
संजयने अर्ज मागे घेण्याचे कारण न्यायालयाला सांगितले नाही. न्यायालयानेही त्याला त्याबाबत विचारणा केली नाही. परंतु न्यायालय ते कारागृह असा प्रसिद्धीमाध्यमांचा ससेमिरा टाळण्याच्या उद्देशानेच संजयने न्यायालयाऐवजी थेट कारागृह प्रशासनासमोर शरणागती पत्करण्यास परवानगी देण्याची विनंती केल्याचे बोलले जात होते.
मुक्काम तूर्तास आर्थर रोड कारागृहातच
संजय नेमक्या कुठल्या कारागृहात जाऊन शिक्षा भोगणार हे अद्याप निश्चित नसले, तरी ‘टाडा’ न्यायालयासमोर शरणागती पत्करल्यानंतर सुरुवातीला त्याला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येईल. तेथून नंतर त्याला येरवडा कारागृहात हलविण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यान, पोलीस महानिरीक्षक (कारागृह) विनोद लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयच्या जिवाला धोका असल्याचे एक निनावी पत्र तीन दिवसांपूर्वी आर्थर रोड कारागृह प्रशासनाकडे आले आहे. परंतु या पत्रात नेमके काय लिहिले आहे हे उघड करण्यास मात्र त्यांनी नकार दिला. संजयबाबत आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
संजय दत्तला येरवडा कारागृहात आणणार?
पुणे- अभिनेता संजय दत्त याला न्यायालयात हजर राहण्यास काहीच तास शिल्लक राहिलेले असताना त्याला कोणत्या कारागृहात ठेवले जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. संजय दत्तने येरवडय़ात दीड वर्ष शिक्षा भोगली असल्याने त्याला येथेच ठेवले जाणार असल्याची माहिती कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईच्या विशेष न्यायालयात सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कारागृह प्रशासनाकडून त्याला येरवडा आणि नाशिक या दोन कारागृहात ठेवले जाऊ शकते. मात्र, संजय दत्त याने पूर्वी येरवडा कारगृहात शिक्षा भोगली असल्याने त्याला या ठिकाणीच ठेवले जाण्याची जास्त शक्यता आहे, असे कारागृहाच्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.