पत्नी मान्यताच्या आजारपणामुळे सध्या संचित रजेवर असलेल्या संजय दत्तने आणखी ३० दिवसांची रजा वाढवण्यात यावी अशी मागणी केली आहे. तीन दिवसांपूर्वीच संजयने रजेसाठीचा अर्ज दाखल केला. मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही असे समजते.
गेल्या महिन्यात म्हणजेच ६ डिसेंबर रोजी संजयची पॅरोलची रजा मंजूर झाली होती. मान्यताच्या आजारपणाचे कारण देत त्याने रजेसाठी अर्ज केला होता, मात्र त्याचवेळी मान्यता एका पार्टीत दिसल्याने संजयच्या रजेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते व मोठा वादही झाला होता. अखेर पंधरा दिवसांनी म्हणजेच २१ डिसेंबर रोजी संजय पॅरोलवर बाहेर पडला. यानंतर संजय दत्तने पत्नीला टीबी असल्याचे सांगत सुट्टी वाढवून मिळावी, असा अर्ज केला आहे.
१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला दोषी ठरवण्यात आले असून त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र यापूर्वी त्याने काही काळ तुरूंगात घालवल्याने त्याला आता साडेतीन वर्षेच तुरूंगात रहावे लागणार आहे. मे महिन्यापासून संजय येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे.