मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अभिनेता संजय दत्त आपली रजा (फरलो) संपवून उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी बुधवारी सकाळी पुण्यातील येरवडा कारागृहात दाखल झाला. संजय दत्त बुधवारी सकाळी स्वतःच्या गाडीने मुंबईतून निघून येरवडा कारागृहात दाखल झाला. 
कारागृह प्रशासनाच्या नियमावलीनुसार संजय दत्तला एक ऑक्टोबर रोजी १४ दिवसांची रजा मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा त्याच्या रजेला आणखी १४ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे २८ दिवस संजय दत्त आपल्या कुटुंबीयांसमवेत मुंबईमध्येच होता. आपली तब्येत व्यवस्थित असून, उर्वरित रजा भोगण्यासाठी मी पुन्हा येरवडा कारागृहात जात आहे, असे संजय दत्तने बुधवारी सकाळी पत्रकारांना सांगितले.
संजय दत्तला सर्वोच्च न्यायालयाने शस्त्रास्त्र कायद्याखाली पाच वर्षे शिक्षा सुनावली असून, त्यापैकी त्याने अठरा महिन्यांची शिक्षा भोगली आहे. मे २०१३ पासून तो येरवडा कारागृहात उर्वरित शिक्षा भोगत आहे. शिक्षेचा विशिष्ट कालावधी त्याने पूर्ण केला असल्यामुळे त्याला अभिवाचन रजा मंजूर करण्यात आली होती.