मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात अवैधपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याची येत्या गुरुवारी पुण्यातील येरवडा कारागृहातून सुटका होणार आहे. संजय दत्त याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्याची कारागृहातून सुटका होणार आहे.
१९९३ मधील बॉम्बस्फोटांवेळी अवैधपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर संजय दत्तची १६ मे २०१३ ला येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला मे २०१३ मध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी दीड वर्षांची शिक्षा संजयने आधीच भोगली होती. त्यामुळे पुढची साडेतीन वर्षे त्याला तुरुंगात घालवायची होती. राज्याच्या गृह मंत्रालयानेही संजय दत्तच्या सुटकेला मंजूरी दिल्याचे यापूर्वीच सूत्रांकडून समजले होते.
अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरूंग) भूषण उपाध्याय यांनी गेल्या महिन्यात एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्तला शिक्षेत मिळालेली सवलत नियमबाह्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. जेल मॅन्युअलच्या नियमानुसार प्रत्येक कैद्याला महिन्याला सात दिवसांची रजा माफ केली जाते. यानुसार कैद्याची वर्षभरात ८४ दिवसांची शिक्षा कमी होते. याशिवाय, कैद्याची तुरूंगातील वागणूक चांगली असेल तर प्रत्येक वर्षी आणखी ३० दिवसांची शिक्षा माफ केली जाते. या हिशेबाने संजय दत्तची वर्षाला ११४, तर पाच वर्षांत ५७० दिवसांची शिक्षा माफ करणे नियमाला धरून आहे. या व्यतिरिक्त तुरूंग अधीक्षकांना ३० दिवसांची, उपमहासंचालकांना ६० दिवसांची आणि अतिरिक्त पोलीस महासंचालकांना ९० दिवसांपर्यंत शिक्षा माफ करण्याचा अधिकार असतो.