मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील श्रीवल्ली वाघिणीच्या एका सहा महिन्याच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकताच घडली. या बछड्याला एक दुर्मीळ विषाणूजन्य आजार झाला होता. त्यामुळे मागील काही आठवड्यांपासून या बछड्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान १६ एप्रिल रोजी बछड्याचा मृत्यू झाला, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने दिली.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील श्रीविल्ली वाघिणीने २ ऑक्टोबर २०२५ रोजी पाच बछड्यांना जन्म दिला होता. त्यातील एका बछड्याला काही आठवड्यांपूर्वी ‘फेलाइन इन्फेक्शस पेरिटोनायटिस’ (एफआयपी) नावाचा दुर्मीळ विषाणूजन्य आजार झाला होता. आजाराचे निदान झाल्यांनतर बछड्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यानच बछड्याचा मृत्यू झाला, असे उद्यान प्रशासनाने सांगितले. या आजाराचे निदान लवकर झाल्याने इतर प्राण्यांमध्ये त्याचा प्रसार टाळता आला.

उद्यानातील सर्व प्राण्यांच्या आरोग्यासंबंधी आवश्यक ती खबरदारी उद्यान प्रशासनाकडून घेण्यात येत आहे, असे दक्षिण विभागाच्या उपसंचालकांनी सांगितले. दरम्यान, श्रीविल्लीचे इतर चार बछडे सुरक्षित असून पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली त्यांची चांगली वाढ होत आहे, असेही त्यांनी सांगितले.