मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कार्यक्षेत्रातील एका पाड्याच्या परिसरात बिबट्याने दोघांवर हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. त्यात चंदू खरपडे आणि उमेश खरपडे (२४) हे मुलगा आणि वडील जखमी झाले होते. त्यांना कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या उपसंचालक (दक्षिण) यांच्या कार्यक्षेत्रातील मालाड येथील भातुकली पाडा परिसरात राहणारे चंदू खरपडे हे शनिवारी सकाळच्या सुमारास विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर एक बिबट्याने हल्ला केला. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर त्यांचा मुलगा उमेश खरपडे घटनास्थळी दाखल झाला. त्याच्यावरही बिबट्याने हल्ला केला. त्यात दोघेही जखमी झाले होते.
दरम्यान, उद्यान क्षेत्रात बिबट्या आणि अन्य वन्य प्राण्यांचा वावर असल्याने उद्यान क्षेत्रातील अंतर्गत भागात एकट्याने फिरताना काळजी घ्यावी किंबहुना प्रवेश करू नये. तसेच उद्यान क्षेत्राच्या सीमारेषेवरील मानवी भागांतील कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्यात यावी. जेणेकरून मानवी वस्ती जवळ बिबट्याचा संचार राहणार नाही, अशा सूचना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या उपसंचालक दक्षिण यांच्या कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.
