मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आठ वर्षाच्या नर बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. या बिबट्याला ‘सूर्या’ असे नाव देण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून त्याच्यावर मूत्रपिंड आणि यकृताशी संबंधित गंभीर विकारांवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान सूर्याचा मृत्यू झाल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून सोमवारी देण्यात आली.
अहिल्यानगर येथील वन विभागातून सूर्याला २०१८ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. त्यावेळी तो अवघा दोन महिन्यांचा होता. उद्यान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या छोट्या बछड्याचे संगोपन आणि पालनपोषण उद्यानातच करण्यात आले. त्याची मागील आठ वर्षांपासून नियमित देखभाल तसेच निगा राखण्यात येत होती. तथापि, १३ मे रोजी सूर्याच्या प्रकृतीत बदल झाल्याने काही तपासण्या करण्यात आल्या.
तपासणीनंतर सूर्याला मूत्रपिंड तसेच यकृताशी संबंधित गंभीर विकार झाल्याचे निदान झाले. त्यानुसार, त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु करण्यात आले. मात्र, १५ मे रोजी सूर्याची प्रकृती खालावत गेली आणि रविवार, १७ मे रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वाचविण्यात आलेल्या अनेक बिबट्यांवर उपचार केले जातात तसेच त्यांनतर त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात येते. वाचविण्यात आलेल्या बिबट्यांमध्ये काहीवेळा मानवी वस्तीतून पकडण्यात आलेल्या बिबट्यांचा समावेश असतो. उपचारानंतर त्यांचा वैद्यकीय अहवाल आल्यांनतर त्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येते. तर काही बिबटे हे पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येतात.
तसेच काही वेळा राज्यातील इतर वन विभागांकडून छोटे बछडे उद्यानात आणले जातात त्यांचेही विशेष संगोपन उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली करण्यात येते. तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे वन्यप्राणी दत्तक योजना राबविण्यात येते. या अंतर्गत काही ठरविक रक्कम भरून वर्षभरासाठी प्राणी दत्तक घेता येतात. याआधी अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींसह मनोरंजन क्षेत्रातील काही अभिनेते आणि दिग्दर्शकांनीही अशा प्रकारे बिबट्यांसह विविध वन्य प्राणी दत्तक घेतले आहेत.
दरम्यान, मार्चमध्ये सहा वर्षाच्या ‘बिट्टू’ या बिबट्याचाही मूत्रपिंडासंबंधी आजाराने मृत्यू झाला होता. तसेच डिसेंबर २०२५ मध्ये भाईंदर येथील मानवी वस्तीतून वाचविण्यात आलेल्या नर बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले होते. मात्र, २ फेब्रुवारी २०२६ रोजी तो येऊर वनपरिक्षेत्रातील नागला भागात मृतावस्थेत आढळून आला होता.
