मुंबई : मुंबईची फुप्फुसे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची सध्याची ओळख पुसून त्याचे नामांतर केले जाण्याच्या हालचाली सुरु आहेत. नामांतरासाठी शासन आग्रही असल्याचे दिसत असून हा धोरणात्मक निर्णय असून शासनाने विचार करून निर्णय घ्यावा, असे उत्तर राज्याच्या प्रधान मुख्य वनसरंक्षकांनी शासनाला दिले आहे. त्याचवेळी नाव बदलले तरी कायदेशीर दर्जा आबाधित राहण्यासाठी ‘राष्ट्रीय उद्यान’ हे शब्द कायम ठेवावेत असेही सुचवले आहे.
बोरिवली येथे असणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे देशातील महत्वाच्या राष्ट्रीय उद्यांनापैकी एक आहे. मुंबईच्या वाढत्या शहरीकरणातही अगदी मानवी वस्तीला खेटून असणाऱ्या या उद्यानाकडून वन्यजीवांच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्वाचे काम केले जात आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरही हे उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणून परिचित आणि प्रसिद्ध आहे. कॉंग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे नाव १९८१ साली उद्यानाला देण्यात आले. तेव्हापासून गेली ३५ वर्षे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अशी असलेली ओळख आता बदलण्यासाठी शासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. या उद्यानास भाजपचे नेते आणि माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे, असे पत्र शासनाने प्रधान मुख्य संरक्षकांना १४ मे रोजी पाठवले आहे.
पत्रात काय?
शासनाच्या पत्रावर उत्तर म्हणून प्रधान मुख्य वनसरंक्षक (पीसीसीएफ) वन्यजीव यांनी वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात दोन प्रमुख प्रस्तावांचा उल्लेख आहे. यात पहिला प्रस्ताव नामांतराचा असून त्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून ते ‘अटलबिहारी वाजपेयी पार्क’ असे करण्यात यावे असा आहे. तर दुसरा म्हणजे राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात जागतिक दर्जाच्या ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी’ विद्यापीठाची स्थापना करण्याबाबत आहे. नाव बदलणे हा धोरणात्मक विषय असून त्यावर राज्यसरकारने विचार करून निर्णय घ्यावा असे वन विभागाकडून शासनला दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच नवीन नाव देताना त्यात ‘राष्ट्रीय उद्यान’ हा शब्द कायम ठेवावा जेणेकरून या क्षेत्राचा संरक्षित क्षेत्र म्हणून असलेला कायदेशीर दर्जा स्पष्ट राहील, असेही सुचविण्यात आले आहे.
उद्यान परिसरात विद्यापीठ स्थापन करण्यास आक्षेप
विद्यापीठ स्थापन करण्याबाबत प्रधान मुख्य वनसरंक्षक (पीसीसीएफ) यांनी पाठवलेल्या पत्रातून आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई महानगर प्रदेशातील एक महत्वाचा वन्यजीव अधिवास असून या परिसरात विद्यापीठ उभारल्यास बांधकाम, वाहतूक व्यवस्था यांमुळे वन्यजीव अधिवासावर परिणाम होऊ शकतो. विद्यापीठासारख्या आस्थापनेचा वन्यजीव संवर्धन आणि संरक्षित क्षेत्राच्या व्यवस्थापनाशी मेळ बसत नाही असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर १९७२ च्या वन संवर्धन कायद्याचा संदर्भ देऊन राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस करता येणार नाही, असे विभागाने स्पष्ट केले आहे. शासनाला असे विद्यापीठ स्थापन करायचे असेल तर ते उद्यानाच्या बाहेर आणि पर्यावरणाच्यादृष्टीने संवेदनशील नसणाऱ्या तसेच वन्यजीव क्षेत्राच्या बाहेर योग्य जमीन शोधून उभे करण्यात यावे, असेही सुचवण्यात आले आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जैवविविधेतेचे रक्षण करण्याऐवजी नामांतराचा घाट घालणे हे अत्यंत चुकिचे आहे. नाव बदलल्याने उद्यानाचा इतिहास पुसला जाणार नाही. शासनाने नव्या उद्यानाची निर्मिती करून त्याला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले असते तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते. मात्र, या उदाहरणावरून शासनाला केवळ नामांतरात रस आहे. उद्यानात होणारे अतिक्रमण आणि वन्यजीवांचे संवर्धन या विषयात शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे जेणेकरून वन्यजीव मोकळा श्वास घेतील. – स्टॅलिन डी, संस्थापक, वनशक्ती
