मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या नामांतर आणि उद्यान परिसरात जागतिक दर्जाचे विद्यापीठ उभारण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला मुंबईतील पर्यावरणासाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी कडाडून विरोध केला आहे. या प्रस्तावांना विरोध दर्शविणारे पत्र संस्थांनी राज्याच्या महसूल आणि वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (वने) यांना पाठविले आहे. यात उद्यानाच्या नामांतरला विरोध करण्यात आला असून परिसरात विद्यापीठ उभारल्यास मुंबई महानगर प्रदेशातील पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो, असेही नमूद करण्यात आले आहे.

शासनाच्या प्रस्तावांना मुंबईतील पर्यावरणासाठी कार्य करणाऱ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (ओआयपीए), अम्मा केअर फाउंडेशन (एसीएफ) आणि प्लांट ॲण्ड ॲनिमल वेल्फेअर सोसायटी – मुंबई (पॉज-मुंबई) या स्वयंसेवी संस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर प्रदेशांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून हे उद्यान जैवविविधता, जलस्रोत, वन्यजीव अधिवास आणि पर्यावरणीय समतोल टिकवून ठेवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असून वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी या परिसरात विद्यापीठ उभारू नये, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे नाव मुंबईच्या सामाजिक आणि पर्यावरणीय इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग असून उद्यानाच्या नामांतरालाही विरोध आमचा आहे, असे निशा कुंजू यांनी सांगितले.

मुंबईचे फुप्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्याचे ‘अटल बिहारी वाजपेयी पार्क’ असे नामांतर करण्याचा घाट शासन स्तरावर घातला जात आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांनी वन विभगाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पाठवलेल्या पात्रात शासनाच्या दोन प्रमुख प्रस्तावांचा उल्लेख केला आहे. यात पाहिला प्रस्ताव नामांतराचा असून त्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्याचे नाव बदलून ‘अटल बिहारी वाजपेयी पार्क’ असे करण्यात यावे, तर दुसरा प्रस्ताव राष्ट्रीय उद्याच्या परिसरात जागतिक दर्जाच्या ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी विद्यापीठा’ची स्थापना कारण्याबाबतचा आहे. याबाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांनी उद्यानाचे नामांतर करताना राज्य सरकारने विचार करून निर्णय घ्यावा, तसेच नावातील ‘राष्ट्रीय उद्यान’ शब्द कायम ठेवण्याचे सुचविले आहे. तसेच उद्यान हे मुंबई महानगरप्रदेशातील महत्त्वाचा वन्यजीव अधिवास असून या परिसरात विद्यापीठ उभारण्यास आक्षेप घेतला आहे.