मुंबई : भाजप – शिवसेना (शिंदे) महायुतीचे मुंबईच्या उपमहापौर पदाची उमेदवारी शिवसेनेचे (शिंदे) नवनिर्वाचित नगरसेवक संजय घाडी यांना दिली असून अ.भा. सेना, मनसे, शिवसेना असा राजकीय प्रवास करून आता शिवसेनेत (शिंदे) दाखल झालेल्या संजय घाडी यांच्या गळ्यात उपमहापौर पदाची माळ पडलीे आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मधून शिवसेनेच्या (शिंदे) उमेदवारीवर विजयी झालेल्या संजय घाडी यांचे इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत झाले. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये झाले. फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयात त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले.

महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच ते अ. भा. विद्यार्थी सेनेत सक्रिय होते. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून ते ओळखले जात होते. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली, तेव्हा संजय घाडी यांनी मनसेत प्रवेश केला. कालांतराने मनसेला सोडचिठ्ठी देऊन ते शिवसेनेत दाखल झाले. शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून ते शिवसेनेत (शिंदे) दाखल झाले.

शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेचे विभाग प्रमुख, १९९०-९१ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंड कौन्सिलचा अध्यक्ष व सिनेट सदस्य, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्य सरचिटणीस, शिवसेना उपनेता व सध्या शिवसेनेचे (शिंदे) रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आहेत. मुंबई महानगरपालिकेची २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. पत्नी संजना घाडी शिवसेनेच्या (शिंदे) उपनेत्या व प्रवक्त्या असून त्यांचा मुलगा सुयश संजय घाडी युवासेना विधानसभा समन्वयक आहे,