मोदी सरकारच्या मेक इन इंडिया सप्ताहातून महाराष्ट्रात गुंतवणुकीचा पाऊस पडल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उभे केलेले चित्र फसवे असून नरेंद्र मोदी यांच्या व्हायब्रंट गुजरातचीच ही दुसरी आवृत्ती आहे, अशी टीका करीत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी फडणवीस सरकारवर फसवणुकीचा ठपकाच ठेवला.
मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत व्हायब्रंट गुजरातच्या नावाने गुजरातमध्ये १२ लाख कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली, पण प्रत्यक्षात मात्र केवळ ६२ हजार कोटींचीच गुंतवणूक तेथे झाली. त्याच्या बदल्यात गुजरातमधील शेकडो एकर जमीन कवडीमोलाने बिल्डर आणि उद्योजकांना देण्यात आली. महाराष्ट्रातही असे होऊ नये, मोलाची जमीन कवडीमोलाने दिली जाऊ नये अशी आमची इच्छा आहे, असा टोला निरुपम यांनी पत्रकार परिषदेत मारला. यावेळी बोलताना त्यांनी मेक इन इंडिया सप्ताहाची शो-बाजी म्हणून खिल्ली उडविली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणांबाबतही त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी ज्या २४३६ कंपन्यांसोबत करार झाल्याचे मुख्यमंत्री सांगतात, त्यापैकी बहुतेक कंपन्या तोटय़ात आहेत, तर अनेक कंपन्यांनी प्रकल्पांची घोषणा वर्षभरापूर्वीच केली होती. त्याच घोषणा पुन्हा नव्या वेष्टनात गुंडाळून मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राची फसवणूक करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.