मुंबई : शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या दररोजच्या शिवीगाळीने आणि अर्वाच्च भाषेने महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लागत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी शिवसेनेच्या (शिंदे गट) महिला सेनेने मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. राऊत स्वत:ला कायद्यापेक्षा मोठे समजत आहेत. लोकप्रतिनिधी, माता भगिनींचा अवमान करणाऱ्या आणि त्यांना जाहीर धमक्या देणाऱ्या राऊत यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा. अन्यथा शिवसेना पद्धतीने तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा शिंदे गटाच्या महिला सेनेने दिला आहे.

शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. यात शिवसेना नेत्या मीना कांबळी, उपनेत्या शीतल म्हात्रे, राष्ट्रीय सचिव शायना एन सी, उपनेत्या व बेस्ट अध्यक्षा तृष्णा विश्वास राव, उपनेत्या सुवर्णा करंजे, कला शिंदे, मुंबई मनपा विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर, सुधार समिती अध्यक्षा संध्या दोषी तसेच अनेक आजी माजी नगरसेविका, सर्व महिला विभागप्रमुख होत्या. शीतल म्हात्रे म्हणाल्या, शिवसेनेत नुकताच प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या सर्व खासदारांना उद्देशून राऊत यांनी जाहीर शिवीगाळ केली. राजकीय वैमनस्यातून राऊत यांनी विकृतीच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत, अशी टीका म्हात्रे यांनी केली.

राऊत यांनी महिलेला फोनवर शिवीगाळ आणि धमकी दिल्याची ध्वनिफीत महाराष्ट्राने ऐकली आहे. महिलांविषयी आकस आणि सूडबुद्धीने राऊत सातत्याने खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. कितीही शिवीगाळ केली तर आपले कोणीही, काही करु शकत नाही, असा त्यांचा समज झाला असून ते कायद्यापेक्षा स्वत:ला मोठं समजत आहेत. त्यामुळे राऊत यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ७९, १९६, ३५१, ३५२, ३५३, ३५६ नुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि राऊत यांना अटक करावी, अशी लेखी मागणी करण्यात आली आहे.

राऊत समाज माध्यमांवर बंदुक हातात धरून छायाचित्र पोस्ट करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत का, याची पोलीसांनी चौकशी करावी. राऊत यांना अटक केल्यानंतर ठाण्यातील मनोरुग्णालयात पाठवावे, शिवसेनेकडून राऊत यांच्यासाठी मनोरुग्णालयातील एक खाट राखून ठेवल्याचा टोला म्हात्रे यांनी लगावला.