शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अमरावतीत झालेल्या दंगलीवर बोलताना भाजपावर सडकून टीका केली. तसेच भाजपाच्या आरोपांवरही प्रत्युत्तर दिलं. भाजपाने राज्य सरकार केवळ हिंदूंवर गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप केला. यावर त्यांनी दंगलीत सहभागी भाजपाच्या काही लोकांवर गुन्हे दाखल होणं म्हणजे हिंदूंवर गुन्हे दाखल झाले असं नसल्याचं मत व्यक्त केलं. तसेच जे दंगलखोर आहेत, ज्यांनी अमरावती पेटवली त्यांच्यावर कारवाई होईल, असंही नमूद केलं. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “भाजपाच्या काही लोकांवर गुन्हे दाखल होणं म्हणजे हिंदूंवर गुन्हे दाखल झाले असं नाही. तसा आरोप करणं चुकीचं आहे. जे दंगलखोर आहेत. ज्यांनी अमरावती पेटवली, ज्यांनी अमरावतीच्या जनतेचं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं ते कुणीही असू द्या कायदा त्यांच्यावर कारवाई करेन. एका पक्षाचे आहेत म्हणून ते हिंदू किंवा मुस्लीम आहेत हे चालणार नाही.”

” दंगलीत सहभागी लोक एका गटाचे नसतात, ते दंगलखोर असतात “

“एखाद्या पक्षाचे लोक दंगलीत सहभागी आहेत तर ते एका गटाचे नसतात ते दंगलखोर असतात. रझा अकादमीवर बंदीचा विचार केला जात आहे. सरकार, गृहमंत्री त्यावर निर्णय घेतील. भाजपाने आपली आक्रमकता दंगली भडकावून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी दाखवू नये, तर तेथे शांतता निर्माण करण्यासाठी दाखवावी. कोणी कोणत्याही पक्षाचा का असेना असं करणं योग्य नाही. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“भाजपा आक्रमक आहे म्हणजे त्यांना परत दंगल करायची आहे का?”

भाजपाच्या आक्रमक भूमिकेवर हल्ला चढवताना संजय राऊत म्हणाले, “भाजप अजूनही आक्रमक आहे म्हणजे त्यांना परत दंगल करायची आहे का? ते कशासाठी आंदोलन करत आहेत. जे काय व्हायचं ते कायद्यानं होईल ना. ते महागाई विरोधात आंदोलन करत आहेत का? की तिकडे चीन लडाखमध्ये घुसला म्हणून आंदोलन करत आहेत? भाजपानं सांगावं कशासाठी आंदोलन करत आहेत.”

“हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घाला”, भाजपाच्या आव्हानावर संजय राऊत म्हणाले, “भाजपाने रझा अकादमीवर बंदी का घातली नाही? फडणवीस सरकारच्या काळातही काही प्रकार घडले होते. या राज्याचं सरकार कायद्याबाबत कुठेही नमतं घेत नाही. काय करायचं आहे त्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सक्षम आहेत,” असंही राऊतांनी नमूद केलं.

“अमरावती दंगलीत फडणवीसांनी काड्या करू नये”

संजय राऊत म्हणाले, “हे ठाकरे सरकार आहे. इथे कारवाई करताना गट तट पक्ष पहिला जात नाही. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी आगीत तेल न टाकता अमरावतीसारख्या घटना घडू नयेत यासाठी शांत राहण्यासाठी काम केलं पाहिजे. अमरावतीसारख्या घटनांचं राजकारण, पेटवापेटवी महाराष्ट्राला परवडणारी नाही. महाराष्ट्र हा काही दंगलीसाठी ओळखला जाता कामा नये. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे.”

हेही वाचा : अमरावती दंगल; फडणवीसांनी काड्या करू नये : संजय राऊत

“तुम्ही पाहिलं तर अमरावतीच्या शेजारी गडचिरोलीत याच पोलिसांनी २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. कायद्यासमोर सगळे समान आहेत. अमरावतीमध्ये दंगल कोणी पेटवली, कोणत्या कारणाने पेटवली, त्यामागे कोण होतं हे देशालाही माहिती आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनाही माहिती आहे आणि अमरावतीमधील जनतेलाही माहिती आहे. वातावरण सगळं शांत झालं असताना उगाचच काड्या करण्याचं काम ना इकडल्यांनी, ना तिकडल्यांनी कोणीही करू नये एवढंच मी महाविकासआघाडीतर्फे त्यांना आवाहन करेल,” असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला.

“अमरावतीत गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली का?”

यशोमती ठाकूर यांनी गुप्तचर यंत्रणा अपयश ठरल्याचं मान्य केलं. ज्या दिवशी घटना घडली तेव्हा जिल्हाधिकारी नव्हते, पोलीस नव्हते. सरकारमधील काही मंत्र्यांनाच तसं वाटतंय असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, “कधी कधी इंटेलिजन्स फेल होतं. शेवटी तेही माणसंच आहेत. देशभरात अनेक घटनांबाबत इंटेलिजन्स फेल होत असतं. काश्मीर, त्रिपुरामध्ये देखील होतं. असं असलं तरी अमरावतीतील दंगल नियंत्रणात आणली. आज अमरावतीत शांतता नांदत आहे हे महत्त्वाचं आहे.”