शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकत्याच केलेल्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्या आणि शिवसेनेला यूपीए आणि गांधी कुटुंब की ममता बॅनर्जी अशी निवड करण्याची वेळ आल्यास कुणाला महत्त्व देणार या प्रश्नाचंही उत्तर दिलंय. ते टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले, “ममता बॅनर्जी यांना देखील अनेक पक्षांना एकत्रित घेऊनच आघाडी स्थापन करावी लागेल. त्या एकट्या तर संपूर्ण देशभर लढू शकत नाही. त्या त्यांच्या पक्षाचा विस्तार करू शकतात, पण आज भाजपाने जी व्यवस्था केलीय त्याच्याशी लढण्यासाठी सर्वांना एकत्रच यावं लागेल. मला वाटतं अजून काही काळा जाऊ दिला पाहिजे. मी दिल्लीत जाणार आहे. तेथे काही प्रमुख लोकांशी माझा संवाद सुरू आहे. वेगवेगळ्या राज्यातील पक्षांची त्या त्या राज्यातील काही व्यक्तिगत राजकीय मजबुरी असते म्हणून ते वेगळी भूमिका घेतात. असं असलं तरी राष्ट्रीय स्तरावर सगळ्यांना एकत्र यावं लागेल.”

“शिवसेना यूपीएत कधी जाणार?”

“शिवसेना यूपीएत कधी जाणार यावर उद्धव ठाकरे घेतील. मात्र, सध्या महाराष्ट्रात जी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची महाविकास आघाडी आहे ही मिनी यूपीएच आहे. ही पण यूपीएच आहे,” असं राऊतांनी नमूद केलं.

“गांधी कुटुंबावर हल्ला करणं हाच मोदींचा आजही एक कलमी कार्यक्रम”

संजय राऊत पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस सामना वाचतात, संपादकीय अग्रलेख वाचतात आणि विचार करतात हे चांगलं आहे. जर नरेंद्र मोदी यांचा आजही एक कलमी कार्यक्रम गांधी कुटुंबावर हल्ला करणं असेल तर त्यांचाही केंद्र गांधी कुटुंबावर आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यावर मोदी अजूनही हल्ले करतात. त्यांचं एकही राजकीय भाषण नाही ज्यात मोदी गांधी कुटुंबावर हल्ला करत नाही. पक्षाच्या कार्यकारणी बैठकीत देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे गांधी कुटुंबालाच लक्ष्य केलं.”

“आता वेगळी आघाडी करणं म्हणजे भाजपाला मदत करणं होईल”, संजय राऊत यांचा ममतांच्या आघाडीवर निशाणा

संजय राऊत म्हणाले, “यूपीए कुठं हा ममतांचा प्रश्न योग्यच आहे. हा प्रश्न सर्वांनाच पडतो. कारण यूपीए म्हणून ज्या आक्रमकपणे काम केलं पाहिजे ती यूपीए दिसत नाही. यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फार महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलाय. यूपीए नाही ठीक आहे, एनडीए तरी कुठं आहे? आज देशात ना यूपीए आहे, ना एनडीए आहे. कधीकाळी देशात एनडीए-यूपीएचं राजकारण चालत होतं. गेल्या १०-१५ वर्षे यूपीए सत्तेत होती. आज शिवसेना, अकाली दल एनडीएतून बाहेर पडले. रामविलास पासवान यांचाही पक्ष बाहेर पडला. अशावेळी २०२४ साठी यूपीए अधिक मजबूतपणे सर्व पक्षांना घेऊन उभी राहिली पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांचं कायम म्हणणं आहे. यूपीएत अनेक पक्ष यायला तयार नाही असं दिसतं. यात ममता, अखिलेश यादव हे सध्या बाहेर आहेत. त्यांचं मन वळवायला पाहिजे.”

“आता वेगळी आघाडी करून भाजपालाच मदत”

“आता वेगळी आघाडी करून भाजपालाच मदत केली जाईल. कारण त्यात काँग्रेस किंवा काँग्रेसला मानणारे डीएमके, एनसीपी हे पक्ष त्या आघाडीत नसतील तर याचा उपयोग होणार नाही. यात डावेही असू शकतात, ते या आघाडीत येतील का, तर नाही. एक यूपीए राहिल आणि एक ममता बॅनर्जी जो प्रयत्न करत आहेत एक तो राहिल. म्हणजे पुन्हा या सगळ्यातून ‘तुला नाही, मला नाही, घाल कुत्र्याला” या म्हणीप्रमाणे स्थिती होईल. ‘तीन तिघाडा, काम बिघाडा’ या प्रमाणे तीन आघाड्या निवडणूक लढवतील. यातून संवाद साधला पाहिजे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“आधी यूपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं असं म्हटलं त्याचं काय?”

संजय राऊत म्हणाले, “शरद पवार यांनी फार समंजस आणि संयमी भूमिका घेतली आहे. ते म्हटले आधी पर्याय उभा करा, नेतृत्वाचं नंतर बघू. आधी एकत्र या असं त्याचं म्हणणं आहे. सध्या यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी आहेत. सध्या त्या आजारपणामुळे फार सक्रीय दिसत नाहीत. ममता बॅनर्जींनी उचललेला प्रश्न चुकीचा नाही, पण देशात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी करायची असेल तर काँग्रेस वगळून ती होऊ शकत नाही. अनेक राज्यांमध्ये काँग्रेस मजबूत आहे. तो एक वैचारिक पक्ष आहे. आमचेही त्यांच्याशी मतभेद आहेत, तरीही महाराष्ट्रात एकत्र आहोत. जर फॅसिस्ट प्रवृत्तींचा सामना करायचा असेल तर तुम्ही काही मतभेद बाजूला ठेऊन एकत्र आलं पाहिजे.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut answer who is important upa gandhi family or mamata banerjee pbs
First published on: 04-12-2021 at 17:19 IST