कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील काही भागांवर दावा केल्यानंतर वाद रंगला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, हा सीमावाद चिघळू नये म्हणून मंत्र्यांना बेळगावात न पाठवण्याची विनंती मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील आणि देसाई यांना बेळगावात न जाण्याची सूचना केल्याने हा दौरा रद्द झाल्याचं कळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावरून आता शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी शिंदे-भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. संजय राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. “कबड्डीचा खेळ महाराष्ट्रात असून, त्याला एक सीमारेषा असते. या दोन मंत्र्यांनी किमान महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमारेषेला स्पर्श करून तरी यावे. बाकी महाराष्ट्रात काय कबड्डी खेळायची ती खेळा. पण, तिकडे सीमेवर तरी जाऊन यावे,” असे आव्हान संजय राऊत यांनी देसाई आणि पाटील यांना दिलं आहे.

हेही वाचा : “‘अरे’ ला ‘कारे’ करण्याची हिंमत असती तर भाजपावाल्यांनी…”; शिवसेनेचा BJP सहीत CM शिंदेंवर हल्लाबोल

“या लोकांमध्ये हिंमत नाही आहे. हतबल, लाचार लोकं असून, काही करू शकत नाहीत. फक्त बोलतात आणि आम्हाला शिव्या घालतात. त्या बोम्मईंना शिव्या घालून त्यांच्या नावाने बोंबला. शिवरायांचा इतिहास आणि बदनामी करणाऱ्यांना शिव्या घाला. आपण मंत्री आहात, घटनात्मक दर्जा आहे. आपल्याला संरक्षण असून, जायला हवं. मात्र, मुळमुळीत धोरणं असलेलं हे सरकार आहे,” अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा : काय त्या गाड्या… काय त्यांचा वेग!; मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची एकच चर्चा

“बोम्मई यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नाबद्दल वक्तव्य करून आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं. त्यांच्याविषयी हे भूमिकाच घेऊ शकत नाहीत. ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणतात, पण प्रत्यक्षात वेळ येते, तेव्हा शेपटी आत घालतात. ही शेपटी असलेली माणसे आहेत,” अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे-भाजपा सरकारचा समाचार घेतला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut attacks shinde bjp government over maharashtra karnatak border controversey ssa
First published on: 05-12-2022 at 11:50 IST