मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नेतृत्वबदलाच्या चर्चांना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती होऊ शकते, असा दावा राऊत यांनी केला. त्याचवेळी, “एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची कोणतीही संधी नाही,” असे त्यांनी सांगितले.

राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नेतृत्वबदलाच्या चर्चांना नव्याने उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. काही राज्यांतील नेतृत्वातही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही विविध राजकीय अंदाज व्यक्त केले जात आहेत. सत्ताधारी महायुतीकडून या चर्चांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. बावनकुळे यांनी मात्र फडणवीस २०३४ पर्यंत मुख्यमंत्री राहतील असे म्हटले आहे.त्यामुळे सध्या या चर्चा केवळ राजकीय दावे आणि प्रतिदावे यांच्या पातळीवरच आहेत.

केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरच अशा चर्चांना अधिक स्पष्ट दिशा मिळू शकते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे निर्णय आणि महायुतीतील राजकीय समन्वय यावर पुढील घडामोडी अवलंबून असतील.

संजय राऊत यांच्या वक्तव्यामागे राजकीय संदेश दडलेला असल्याचीही चर्चा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात मंत्री म्हणून जातील आणि त्यांची जागा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेतील अशी राजकीय गुगली राऊत यांनी टाकली आहे. महायुतीतील नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर राजकीय दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. फडणवीस हे भविष्यात पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.महायुतीचे नेते मात्र नेतृत्वबदलाच्या चर्चांना फारसे महत्त्व देताना दिसत नाहीत.

आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार कधी होतो, त्यामध्ये महाराष्ट्राला किती प्रतिनिधित्व मिळते आणि त्यानंतर राज्याच्या नेतृत्वात खरोखरच बदल होतो की नाही, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत राऊत यांच्या वक्तव्यामुळे सुरू झालेल्या चर्चाच महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रमुख विषय ठरण्याची शक्यता आहे.