scorecardresearch

“विश्वासघात विश्वासातील माणसाकडूनच होतो हे अजित पवारांनाही माहिती, त्यांना…”, संजय राऊतांचं वक्तव्य

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या पराभवावरून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गाफिल राहिल्याचं म्हटलं. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.

Ajit Pawar Uddhav Thackeray Sanjay Raut
अजित पवार, उद्धव ठाकरे व संजय राऊत (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी महाविकासआघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या पराभवावरून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गाफिल राहिल्याचं म्हटलं. या वक्तव्याविषयी शनिवारी (४ फेब्रुवारी) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत म्हणाले, “अजित पवार यांचं म्हणणं त्यांनी आमच्याकडे वारंवार व्यक्त केलं आहे. उद्धव ठाकरे गाफिल राहिले असं म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी आपल्या लोकांवर जास्त विश्वास ठेवला. त्यांनी आपल्या विश्वासू लोकांवरच जास्त विश्वास ठेवला. विश्वासघात हा विश्वासातील माणसाकडूनच होत असतो. हे अजित पवारांनाही माहिती आहे. त्यांना ते सांगायला नको.”

“या हालचालींचा सुगावा सगळ्यांनाच लागला होता”

“असं असलं तरी आम्हीही या हालचालींची माहिती उद्धव ठाकरेंना देत होतो. याबाबत फक्त अजित पवार सांगत होते किंवा अन्य लोक सांगत होते असं नाही. या हालचालींचा सुगावा सगळ्यांनाच लागला होता. यानंतरही उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं की, हे आपले लोक आहेत, विश्वासाचे लोक आहेत. ते स्वतःला निष्ठावान, कडवट लोक म्हणवतात. त्यांच्यावर असा अविश्वास दाखवणं योग्य नाही. आपण त्यांच्याशी बोलू,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : धनाढ्य उमेदवार, बोगस मतदान ते काँग्रेसने प्रचार न केल्याचा आरोप, वाचा शुभांगी पाटलांची महत्त्वाची विधानं…

“आमच्या सर्वांचा राजकीय शत्रू एकच आहे”

संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेने वारंवार त्यागाची भूमिका ठेवली. आपल्यामुळे महाविकासआघाडीचं नुकसान होऊ नये. आमच्या सर्वांचा राजकीय शत्रू एकच आहे. त्यांचा पराभव झाला पाहिजे. विधान परिषद निवडणुकीत आम्ही ते करून दाखवलं. पाच पैकी चार जागा मविआकडे आहे. एक जागा भाजपाने जिंकली आहे. अमरावती आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या जागा मविआने जिंकल्या. हा विजय आमच्या एकीमुळे झाला आहे.”

“चिंचवडची जागा शिवसेनेने लढावी अशी आमची भूमिका”

“कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा मविआ एकत्रित लढेल. चिंचवडची जागा शिवसेनेने लढावी अशी आमची भूमिका आहे. आग्रह आहे. तरी आम्ही महाविकासआघाडी म्हणून निर्णय घेऊ. या दोन्ही जागी जिंकण्याची सर्वाधिक संधी कोणाला आहे? हे ठरवलं जाईल. त्यानुसार निर्णय घेतला जाईल. आमच्यात कोणतेही मतभेद, रस्सीखेच नाही. मविआने जिंकणं हेच आमचं एकमेव ध्येय आहे,” असं राऊतांनी सांगितलं.

हेही वाचा : शरद पवारांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर ते मोदींचा अंत, ठाकरे गट-वंचितची युती करताना प्रकाश आंबेडकरांची महत्त्वाची विधानं

“विधान परिषद निवडणुकीत आम्ही एकमेकांना मदत केली”

“अंधेरीची पोटनिवडणूक आम्ही जिंकलो तेव्हा सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला. विधान परिषद निवडणुकीत आम्ही एकमेकांना मदत केली. कसबा आणि चिंचवडमध्येही आम्ही त्याच प्रेरणेने लढू,” असंही राऊतांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 13:05 IST