मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांच्या गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं समर्थन करणाऱ्या १४ आमदारांना नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरेंचा आदर असल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांना ही नोटीस दिली नाही. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “बाळासाहेब ठाकरे यांचा आदर असल्याने आदित्य ठाकरेंना नोटीस दिली नाही, असं म्हणणाऱ्यांनी इतर १४ आमदार देखील बाळासाहेब ठाकरेंचेच शिवसैनिक आहेत, हे लक्षात घ्यावं,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं. ते मंगळवारी (५ जुलै) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिंदे गटाकडून आलेल्या नोटीसवर संजय राऊत म्हणाले, “ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे त्यांना नोटीस देऊ द्या. आदित्य ठाकरे यांना सोडून का नोटीस दिल्या हे मला माहिती नाही. जे म्हणतात बाळासाहेब ठाकरे यांचा आदर असल्याने आदित्य ठाकरे यांना नोटीस दिली नाही त्यांनी लक्षात ठेवावं जे इतर १४ आमदार आहेत तेही बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहेत.”

“बंडखोर आमदारांना केवळ पैसा मिळालेला नाही”

संजय राऊत म्हणाले, “नव्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यांनी हे कसं केलं, त्यामागे कोणती महाशक्ती काम करत होती हे लोकांना माहिती आहे. ममता बॅनर्जी यांनी यावर खूप महत्त्वाचं वक्तव्य केलंय. बंडखोर आमदारांना केवळ पैसा मिळालेला नाही, तर आणखीही काही मिळालं आहे. आणखी काही मिळालं आहे यात खूप मोठं रहस्य आहे. सुरतमध्ये, गुवाहाटी, गोवा, मुंबईमध्ये हे आमदार ११ दिवस फिरत होते. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय.”

“आता शिंदे-फडणीस सरकारने महाराष्ट्रासाठी काम केलं पाहिजे”

“आता महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्रासाठी काम केलं पाहिजे,” असा सल्ला संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

“उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नाहीत, ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत”

संजय राऊत यांना गुलाबराव पाटलांच्या टीकेबाबत प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, “बंडखोर ज्या चार लोकांची नावं घेत आहेत त्या चार लोकांमुळेच तुम्हाला कालपर्यंत सत्ता मिळाली. ते जे कुणी चार लोक म्हणत आहेत ते सतत पक्षाचंच काम करत होते. आजही पक्षाचंच काम करतात. गेले अडीच वर्षे सत्तेत राहिले, त्याआधीही राहिले, तेव्हाही हे चार लोक पक्षाचं काम करत होते. ज्यांना तुम्ही आज बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात ते पक्षाचे निष्ठावान आहेत. उद्धव ठाकरे हे काही दुधखुळे नाहीत, ते बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात.”

हेही वाचा : “पुणे पोलिसांनी आनंद दवेंच्या सुरक्षेची काळजी घ्यावी”; उदयपूरच्या हत्येचा उल्लेख करत संजय राऊतांचं ट्वीट

“कारणं सांगू नका, आता मंत्री झालात, काम करा”

“जाणाऱ्यांना फक्त बहाणा हवा असतो. त्यांना पळून जायचं असतं तर ते काहीही कारण शोधतात. तुम्ही निघून गेलात, तर ठीक आहे, पण आता कारणं सांगू नका. आता मंत्री झाला आहात, आता मंत्र्याचं काम करा,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.